Deepika Padukone (फोटो सौजन्य-Instagram)
Deepika Padukone Bought New Home : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांना ८ सप्टेंबरला कन्यारत्न झाले. कन्यारत्न झाल्यानंतर हे कपल सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर मुंबईमध्ये नवीन घर खरेदी केले आहे. दीपिकाने सासू अंजू भवनानी यांच्या घराजवळच घर खरेदी केले आहे. दीपिकाने हे घर वांद्रेमध्ये खरेदी केले आहे.
हे देखील वाचा – इंडस्ट्रीतल्या कलाकारांकडून सई काय शिकली ? म्हणाली…
दीपिकाने हे नवीन घर वांद्रातील सागर रेशम कॉर्पोरेटिंग हाऊसिंग सोसायटीमध्ये पंधराव्या मजल्यावर खरेदी केलं आहे. या सोसायटीमध्ये ४ बीएचके आणि ५ बीएचके फ्लॅट्स आहेत. अभिनेत्रीने हा फ्लॅट तिच्या नावे नाही तर तिचे वडील सहमालक असलेल्या कंपनीच्या नावाने १७१. ४७ स्क्वेअर मीटरचा फ्लॅट खरेदी केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या नव्या घराची किंमत १७.७३ कोटी इतकी असून तिने स्टॅम्प ड्युटी १.७ कोटी इतकी भरली आहे. तर, ३०,००० रुपये रजिस्ट्रेशनसाठी भरले आहेत. अभिनेत्रीने खरेदी केलेल्या अपार्टमेंटमध्ये अनेक सुख सुविधा आहेत.
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ८ सप्टेंबर २०२४ रोजी कन्यारत्न झाले. १५ सप्टेंबरला अभिनेत्री आणि तिची लेक हॉस्पिटलमधून घरी परतली. दीपिका सध्या मातृत्वाचा आनंद घेत असून सध्या तिच्या चिमुकल्या परीची काळजी घेण्यात व्यग्र आहे. दीपिकाने आई झाल्यानंतर इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये बदल केला आहे. “Feed, burp, sleep, repeat”. असे चार शब्द तिने तिच्या बायोमध्ये लिहिले आहेत. याचा अर्थ, सध्या ती तिच्या लेकीला खाऊ घालतेय (स्तनपान करतेय), तिला ढेकर काढून झोपवते, सध्या हे चक्र सुरू आहे, अशा आशयाची दीपिकाची इंस्टाग्राम बायो आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका आपल्या लेकीला नॅनीकडे संभाळायला देणार नसून ती स्वत: सांभाळणार आहे. शिवाय ती आपल्या लेकीला माध्यमांपासून ही दुर ठेवणार आहे.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, दीपिका शेवटची ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर रणवीर ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर आता लवकरच अभिनेता ‘डॉन ३’ आणि ‘सिंघम अगेन’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, दीपिका पदुकोणने २०१८ मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले होते. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. त्याचवेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ’83’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. त्यांचे हे चित्रपट सुपरहिट देखील ठरले.