(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका ‘आई कुठे काय करते’ गेल्या ५ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनावर राज्य करते आहे आणि चाहत्यांच भरपूर मनोरंजन करताना दिसली आहे. अनेकदा मालिकेच्या कथानकावर टीका करण्यात आली होती. परंतु तरीही या मालिकेचा प्रेक्षकवर्ग कमी झालेला नाही. मालिकेवर चाहत्यांनी भरपूर प्रेम केले आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. तर या मालिकेने टीआरपी यादीतही अनेक रेकॉर्ड तोडले आहेत आणि अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. गेल्या काही दिवसापासून मात्र या मालिकेचे टीआरपीचे गणित बिघडले होते. प्रेक्षकांनी मालिका रटाळ झाली आहे, आता बंद करा अशी निर्मात्यांना विनंती देखील केली होती. परंतु आता प्रेक्षकांसाठी ही ‘अरुंधती’ या आईच्या पात्राभोवती फिरणारी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे मराठी अभिनेते मिलिंद गवळी यांनी या मालिकेविषयी भावुक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर एक लांबलचक कॅप्शनसह त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहे. तसेच ही मालिका लवकरच बंद होणार असल्याचे सांगितले आहे. अभिनेता मिलिंद गवळी यांनी ‘आई कुठे काय करते’ कुटुंबाकडून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देणारा एक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ही मालिका निरोप घेणार असल्याची माहिती दिली आहे. ‘डिसेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२४ एवढाच या मालिकेचा प्रवास होता’, असे ते म्हणाले आहेत.
हे देखील वाचा – Baby John: ‘बेबी जॉन’मधील वरुण धवनचा फर्स्ट लूक आऊट, या दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा ट्रेलर!
मिलिंद गवळींने शेअर केली पोस्ट
“मी मिलिंद गवळी , स्टार प्रवाह परिवार आणि डिरेक्टर्स कट प्रोडक्शनकडून तुम्हा मायबाप प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही दीपावली सुखमय, शांतीपूर्ण, आरोग्यदायी, यशस्वी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमची “आई कुठे काय करते” ही स्टार प्रवाहवरची मालिका आपला लवकरच निरोप घेणारआहे. डिसेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२४ हा या मालिकेचा प्रवास होता. या प्रवासामध्ये दोन कोविडचे लॉकडाऊन, आम्ही मात्र एक महिना आधीच शूटिंगला सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळात स्टार प्रवाहने “आई कुठे काय करते”चे भाग पुन्हा प्रक्षेपित केल्यामुळे अनेक लोक जी घरात अडकून पडली होती त्यांनी पुन्हा सिरीयल पाहिली. ती इतकी भावली की अक्षरश: या आमच्या मालिकेला तुम्हा सर्वांनी डोक्यावर घेतलं, आमच्यावर भरभरून प्रेम करत राहिले.’ असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘आमचे निर्माते राजनजी शाही आणि स्टार प्रवाहचे मुख्य अधिकारी सतीशजी राजवाडे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून, आम्हाला जोमानं काम करण्यासाठी सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं. स्टार प्रवाहने आम्हाला त्यांच्या इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रण देऊन, मग ते “होऊ दे धिंगाणा” किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आमचं कौतुक करून जाहिरातही केली.
हे देखील वाचा – सारा अली खान या भाजप नेत्याच्या मुलाला करतेय डेट? अभिनेत्रीचे फोटो झाले व्हायरल!
याचदरम्यान या मालिकेत मधुराणी गोखले-प्रभुलकर मुख्य भूमिकेत आहेत. तर मिलिंद गवळी , गौरी कुलकर्णी, दीपाली पानसरे, रुपाली भोसले , मयूर खंडागे, किशोर महाबोले, अर्चना पाटकर, पूनम चांदोकर, अपूर्वा गोरे, सीमा घोगळे, अभिषेक देशमुख, निरंजन कुलकर्णी, आशिष कुलकर्णी आणि राधा कुलकर्णी हे सहकलाकार काम करत आहेत.
तसेच अभिनेत्याने मालिकेमधील सर्व कलाकारांचे आणि निर्मात्यांचे आभार मानले. याचदरम्यान प्रेक्षकांनी या मालिकेला दिलेल्या प्रेमाबद्दल नेहमीच ऋणी राहील याची खात्री दिली. तसेच अद्यापही मालिका कधी संपणार हे जाहीर झाले नसून, स्टार प्रवाहवर आता काही नव्या मालिका सुरू होणार आहेत. यापैकी ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही निवेदिता सराफ आणि मंगेश जोशी स्टारर मालिका २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता दाखवली जाणार आहे. सध्या या वेळेत आई कुठे काय करते हे दाखवले जात होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांचा निरोप घेईल हे जवळपास निश्चित झाले आहे.