Nitin Desai update : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांनी कर्जत इथल्या एनडी स्टुडिओमध्ये (N.D. studio) गळफास घेत आत्महत्या केली. मुंबईतील जेजे रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी एनडी स्टुडिओत अंत्यसंस्कार केले जातील. देसाई यांची मुलं अमेरिकेत असतात. ते भारतात आल्यानंतर देसाई यांना अखेरचा निरोप देण्यात येईल, अशी माहिती नितीन देसाईंचे जवळचे सहकारी नितीन कुलकर्णी यांनी दिली. त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्या, स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्यांचे फोन पोलीस अधिकार्यांनी घेतले आहेत. तपास सुरू असल्याने कोणालाही आत येण्याची आणि बाहेर पडण्याची परवानगी नाही.” दरम्यान, कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई बुधवारी त्यांच्या स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळले. देसाई यांनी आर्थिक संकटातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.
नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी अशा दिग्गज बॉलिवूड दिग्दर्शकांसोबत काम केले होते. ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘मंगल पांडे’ यासह अनेक चित्रपटांसाठी त्यांनी भव्य-दिव्य सेट उभारले होते. अक्षय कुमार, परिणीती चोप्रा, हेमा मालिनी, मनोज बाजपेयी, रितेश देशमुख यासह इतर सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत देसाईंच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.
नितीन देसाई यांची कंपनी ND’s Art World ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृतींचे आयोजन, देखभाल, संचालन आणि हॉटेल्स, थीम रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स आणि मनोरंजन केंद्रांशी संबंधित सुविधा आणि सेवा प्रदान करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे.