
मुंबई :विनोदाचा बादशहा प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सारखा काहीतरी होतंय’ हे नवं कोरं नाटक लवकरच नाट्य रसिकांच्या भेटीला येतं आहे. खुद्द प्रशांत दामले यांनी त्यांच्या फेसबुकवर या नाटकाचं पोस्टर शेअर करून आपल्या चाहत्यांना सरप्राईज केलं आहे. गेले कित्येक दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशांत दामले यांना नव्या नाटकाची विचारणा प्रेक्षकांकडून करण्यात येतं होती. कोरोना, लॉकडाऊनच्या काळात प्रशांत दामले सोशल मीडियावर बरेच एक्टिव्ह होते. तेव्हा सतत सोशल मीडियातून दामले यांना प्रेक्षकांकडून सातत्याने नव्या नाटकाबद्दल विचारणा झाली होती. दामले यांनीदेखील आपल्या चाहत्यांना नाराज न करता लवकरच नवं काहीतरी घेऊन येतोय असे संकेत दिले होते आणि आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. कारण ‘सारखं काहीतरी होतंय’ हे कॉमेडी नाटक प्रशांत दामले रंगभूमीवर घेऊन येत आहेत.
या नाटकात प्रशांत दामले यांच्यासह अनेक वर्षांनी वर्षा उसगांवकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे सध्या या नाटकाची टीम खूपच एक्साईटेड आहे. 36 वर्षानंतर वर्षा उसगांवकर आणि प्रशांत दामले हे एकत्र काम करत आहेत. या नाटकाचं लेखन- दिग्दर्शन संकर्षण क-हाडेने केलं आहे. या नाटकाचा प्रोमो अलिकडेच संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केला. हा प्रोमो शेअर करताना संकर्षणने कॅप्शनमध्ये लिहलं की, जबाबदारी मोठी आणि वेगळी आहे.आशीर्वाद आणि शुभेच्छा असू द्या. या नाटकात संकर्षण सुध्दा काम करत आहे.