'मानवत मर्डर' मध्ये केव्हाही न पाहिलेला मराठी कलाकारांचा अंदाज
Manvat Murders Trailer Out : बॉलिवूड प्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतीलही दिग्दर्शक नवनवे विषय हाताळताना दिसत आहे. क्राईम आणि थ्रिलर असलेल्या ‘मानवता मर्डर्स’ सीरीजचा नुकताच ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. जादूटोणा, खून आणि रहस्य अशी कथा असलेल्या ह्या सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, आशुतोष गोवारीकर आणि मकरंद अनासपुरे अशी तगडी स्टारकास्ट या सीरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुख्य बाब म्हणजे, सीरीजमध्ये प्रेक्षकांना मराठमोळ्या कलाकारांचा केव्हाही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आशुतोष गोवारिकर अनेक वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांनी या सीरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारली असून एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची भूमिका ते साकारणार आहेत. क्राईम आणि थ्रिलर असणारी ही सीरीज सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार असून सध्या ह्या सीरीजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. ही सीरीज प्रेक्षकांना येत्या ४ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषेत पाहायला मिळणार आहे.
ट्रेलरबद्दल बोलायचं तर, जादूटोणा, खून आणि रहस्य अशी कथा असलेल्या ह्या सीरीजची कथा मानवत गावातील आहे. १९७२ साली मानवत गावात दीड वर्षांत सात जणांचा खून झालेला असतो. या मर्डर मिस्ट्रीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गावात झालेल्या खुनांचा छडा लावण्यासाठी मुंबईहून नवे वरिष्ठ पोलिस अधिकारी (आशुतोष गोवारिकर) येतात. नेमक्या ह्या खुनाचा मुख्य सुत्रधार कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सीरीज पाहिल्यावरच कळेल.
इन्स्पेक्टर खुन्याचा शोध कशापद्धतीने घेणार ? दीड वर्षात ७ खून करणारा मास्टर माईंड कोण ? याचं उत्तर सीरीज पाहिल्यावरच कळेल. सीरीजमधील कलाकारांच्या लूकचं सध्या सोशल मीडियावर जोरदार कौतुक केलं जात असून सई ताम्हणकरच्या नव्या लूकचं चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे. या सीरीजचं दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केलं असून सीरीजची निर्मिती महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी केली आहे.