taarak mehta and asit modi
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या पंधरा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. वेगवेगळ्या कारणांमुळे ही मालिका नेहमी चर्चेत राहिली आहे. अनेक कलाकारांनी मालिका सोडली. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे, शैलेश लोढा.(Shailesh Lodha) शैलेश लोढा यांनी मालिकेत तारक मेहतांचे पात्र साकारलं होतं. चौदा वर्षांनंतर शैलेश लोढा यांनी मालिका सोडली.
काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा यांनी मालिकेचे निर्माते असित मोदींवर थकबाकी न दिल्याबद्दल NCLT मध्ये केस दाखल केली होती. या प्रकरणात ते आता जिंकले आहेत. शैलेश लोढा यांनी एप्रिल 2022 मध्ये मालिका सोडली आहे. मालिकेच्या निर्मात्यांविरोधात दाखल केलेल्या खटल्याचा निर्णय शैलेश लोढांच्या बाजूनेच लागला.
निर्मात्यांनी शैलेश लोढा यांना सेटलमेंट अटींनुसार 1 कोटी 5 लाख84 हजार रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे द्यावे लागणार आहेत. या प्रकरणाची ऑनलाईन पद्धतीने सुनावणी झाली असून दोन्ही पक्षकारांच्या वकिलांच्या माध्यमातून सेटलमेंट करण्यात आली आहे.
एप्रिल 2022 मध्ये शैलेश लोढा यांनी मालिका सोडली होती. या वर्षी शैलेश लोढा यांनी वर्षभर थकलेल्या मंजुरीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) सोबत संपर्क साधला. दिवाळखोरी संहितेच्या कलम 9 अंतर्गत संबंधित प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली.
दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी संमतीच्या काही अटींनुसार निकाल काढला. शैेलेश यांनी या निर्णयानंतर एनसीएलटीचे आभार मानले. ते म्हणाले, “माझी ही लढाई कधीच पैशांसाठी नव्हती. न्याय आणि स्वाभिमान मिळविण्यासाठी मी ही न्यायाची लढाई लढलो. मला असं वाटतं की मी एक लढाई जिंकलीय. मला सत्याचा विजय झाल्यामुळे आनंद झाला आहे.”
पुढे मुलाखतीत शैलेश लोढा म्हणाले, “माझे थकलेले पैसे पूर्ण करण्यासाठी मी काही कागदपत्रांवर सही करावी अशी त्याची इच्छा होती. मी माध्यमांसोबत काही गोष्टींसंबंधित बोलू शकत नाही, अशी काही कलमं त्यात होती. पण मी त्यावर सही केली नाही. माझे स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी मी कोणत्याही कागदपत्रांवर सही का करू?” असं त्यांनी नमूद केलं. शैलेश लोढा यांनी पुढे सांगितलं की, त्यांच्या लढ्याने शोचा भाग असलेल्या दुसर्या कलाकारांनाही मदत झाली आहे.
ते म्हणाले की,“मला नाव सांगायचे नाही. एका अभिनेत्याला गेल्या वर्षांपासून अधिक काळ पगार मिळालेला नाही. मी खटला दाखल केल्यानंतर, त्यांना प्रॉडक्शन हाऊसने बोलावले आणि त्यांची थकबाकी दिली. त्याबद्दल त्याने माझे आभार ही मानले.” शैलेश, हे सुप्रसिद्ध कवी आणि लेखक देखील आहेत.