फोटो सौजन्य - Social Media
‘अरण्य’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘रेला रेला’ प्रदर्शित झालं आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. जंगल, भावना आणि संघर्ष यांची कहाणी सांगणारा हा चित्रपट आता संगीताच्या माध्यमातून अधिक रंगतदार बनला आहे.
‘रेला रेला’ हे गाणं Energy ने भरपूर प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडणारं गाणं आहे. मुख्य पात्रांच्या लग्नसोहळ्याच्या आनंदी क्षणांना या गाण्यातून सुंदरपणे सादर करण्यात आलं आहे. अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजाला नितीन उगलमुगळे यांचं आकर्षक संगीत लाभलं आहे. गाण्याचे पारंपरिक बोल मुकुंद भालेराव यांनी अधिक खुलवले आहेत. गाण्याची लय, ठेका आणि सांस्कृतिक रंगत प्रेक्षकांना थिरकायला लावेल, यात शंका नाही.
दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांनी या गाण्याबद्दल सांगताना म्हटलं, ‘रेला रेला’ हे गाणं प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं आहे. अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजासोबत नितीन उगलमुगळे यांचं कमाल संगीत गाण्याला चारचाँद लावतात. या गाण्यातून विदर्भातील संस्कृतीची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.” निर्माता शरद पाटील यांनी सांगितलं की, ‘अरण्य’मधून आम्ही प्रेक्षकांना एक भावनिक प्रवास घडवण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टरला, टिझरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि आता ‘रेला रेला’ गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
एस. एस. स्टुडिओ निर्मित आणि एक्स्पो प्रस्तुत ‘अरण्य’ या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन अमोल दिगांबर करंबे यांनी केलं आहे. शरद पाटील आणि अंजली पाटील हे चित्रपटाचे निर्माते असून, हार्दिक जोशी, वीणा जगताप, हृतिक पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत.
हा भव्य चित्रपटप्रवास येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ‘रेला रेला’ गाण्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत आणखी भर घातली आहे.