The Kerala Story : ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा (The Kerala Story movie) रिलीज झाल्यापासून वादात सापडला आहे. काही राज्यांमध्ये सिनेमांवर बंदी घालण्यात आली तर काही राज्यांनी टॅक्स फ्री केला. नुकतीच या सिनेमाच्या टीमने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पीडित मुलींपैकी 25 मुलींना सिनेमाच्या टीमने समोर आणलं. यावेळी या पीडित मुलींनी त्यांची कथा, (Victim story) त्यांना कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागलं ते सांगितलं. त्यांच्या कथा हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत.
‘घरी पूजा व्हायची आणि मी गच्चीवर नमाज अदा करायचे’
पीडित मुलींपैकी एक अनघा जयगोपाल म्हणाली, “दोन वर्षांपूर्वी माझे धर्मपरिवर्तन झाले. शालिनी (सिनेमात अदा शर्माने साकारलेली) सारखी माझी अवस्था झाली होती. सिनेमात दाखवलेल्या असिफासारख्या हॉस्टेलमध्ये अनेक मुली होत्या, ज्या बोलताना कायम धर्म मध्ये आणायच्या. आम्हाला ही गोष्ट गोंधळात टाकायची. धर्माचे ज्ञान नसल्याने मी कधी माझी बाजू मांडू शकले नाही” असंही अनघा म्हणाली.
“या मुली म्हणायच्या की देव एकच आहे तो म्हणजे अल्लाह, त्यांनी मला कुराणाची हिंदी आवृत्ती दिली, ती वाचून मी त्यात अडकले, मी हिंदूविरोधी झाले, कुटुंब सोडलं आणि पूर्णपणे इस्लाम धर्म स्वीकारला. घरी पूजा असायची आणि मी गच्चीवर नमाज अदा करायचे. ज्यांनी मला जन्म दिला त्यांना मी काफीर म्हणू लागले. मी माझ्या चुलत भावाच्या मुलीवरही राग काढला होता, कारण ती मला नमाज अदा करू देत नव्हती. हा सिनेमा पाहिल्यावर मला रडू कोसळले.” असे अनघाने आवर्जून सांगितले.
केवळ मुलीच नाही तर मुलांचेही धर्मांतर झाले
पीडित मुलींपैकी चित्रा म्हणाली, “जवळपास 7 हजार फक्त मुलीच नाहीत तर मुलेही होती. ज्यांचे धर्मांतर झाले त्यांनी आपलं कुटुंब सोडलं. त्यांच्यात झालेला बदल त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या सगळ्यांना आश्रमात आणले. यातून बाहेर आल्यानंतर पु्न्हा त्याबद्दल बोलायची कोणाचीची इच्छा नव्हती आणि म्हणूनच याची कुठेही नोंद नाही. त्यांना आपली ओळख लपवायचीय.
“24 वर्षांमध्ये 7 हजारजण हिंदू धर्मात परतल्याचं पीडित श्रुतीने सांगितले. एवढंच नाही तर, आर्ष विद्या समाज या आश्रमात धर्मांतरित झालेल्या मुलींना मदत केली जाते. 1999 ते 2023 पर्यंत इस्लाम धर्म स्वीकारलेल्या सुमारे 7000 लोकांना मायदेशी पाठवण्यात आले आहे.”
मदतीसाठी केरळबाहेरील लोकांकडूनही कॉल येत आहेत, त्या सर्वांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले आहे. धर्मांतरित झालेल्या 300 मुलींना आर्ष विद्या आश्रमात सुविधा देण्यात येणार आहेत. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाचे निर्माते विपुल शहा यांनी या आश्रमाला 51 लाखांची देणगी दिलेली आहे. धर्मांतराने पीडित मुलींना वाचवण्यासाठी आश्रमाला 51 लाख रुपये देण्यात आल्याचं विपुल शाह यांनी म्हटलं आहे. धर्मांतर अनेक धर्मात होते पण प्रत्येकाचा उद्देश ISIS ला पाठवणे हे नसते असा सूर या पीडित मुलींनी मांडलेल्या कथांमधून उमटत होता.
काय आहे आर्ष विद्या समाजाचं उद्दिष्ट्य
‘लव्ह जिहाद’मध्ये अडकून ज्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. या मुलींना इस्लाम स्वीकारल्यानंतर त्यांची तस्करी केली जाते. अशा पीडित मुलींना मदत करणाऱ्या काही संस्था आहेत. ‘आर्ष विद्या समाज’ आश्रम हा त्यापैकी एक
आहे. सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार हे या आश्रमाचं उद्दिष्ट आहे. तिरुअनंतपुरम इथे हा आश्रम आहे. 1999 साली या आश्रमाची स्थापना करण्यात आली.