फोटो सौजन्य - Social Media
गणेश चतुर्थी अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला त्या सुवर्ण क्षणांची आतुरता लागली आहे. मुंबईत आगमन सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गावी जाण्याची धडपड सुरु झाली आहे. सर्वीकडे अगदी जल्लोषपूर्ण वातावरण आहे. सोशल मीडियावरही बाप्पाचा ट्रेंड आता सुरु झाला आहे. अशामध्ये मराठी सिने सृष्टीच्या कलाकार मंडळींनी त्यांची तयारी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवण्यास सुरुवात केली आहे. असेच काही उत्साहाचे वातावरण दिग्दर्शक रवी जाधवांच्या घरी आहे.
मराठी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या @ravijadhavofficial या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रवी स्वतः गणपतीची मूर्ती साकारताना दिसत आहेत. मूर्तीला घडवणे आणि तिला रंगाने सुशोभित करण्याचे काम रवी स्वतःच्या हाताने करत असल्याने चाहत्यांना त्यांचे हे कृत्य फार आवडले आहे. यंदाच्याच वर्षी नव्हे तर रवी दरवर्षी त्यांच्या घरातील बाप्पा त्यांच्या स्वतःच्या हातानेच घडवतात. तसेच दरवर्षी प्रमाणे मूर्ती घडवतानाचे ते गोड क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभवायला मिळतात.
रवी जाधव यांनी पोस्टखाली कॅप्शनमध्ये ‘बाप्पांच्या आगमनाची तयारी’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे. तर कमेंट्समध्ये चाहत्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. सर्वात महत्वाचे कौतुक म्हणजे रवी स्वतःच्या हाताने अशी मूर्ती घडवतात जी निसर्गाला पूरक आहे, ज्याने निसर्गाचे काहीच नुकसान होणार नाही.
रवीसहित अन्य अनेक मराठी कलाकार सध्या गणपतीच्या तयारीत रमले आहेत. अनेकांनी त्यांची तयारी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, तर अनेकांची तयारी सोशल मीडियावर येणे अद्याप बाकी आहे. सोशल मीडियावर सिनेकलाकरांच्या बाप्पांची विशेष चर्चा असते. त्या चर्चेला उधाण येण्यासाठी अगदी मोजकेच दिवस शिल्लक आहेत.
रवी जाधव हे त्यांच्या नटरंग तसेच टाईमपाससारख्या चित्रपटांसाठी विशेष ओळखले जातात. हिंदी सिनेसृष्टीतील त्यांची ‘टाळी’ तसेच ‘मैं अटळ हू’ या कृती नावाजल्या आहेत.