(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘फकिरीयत’ हा आगामी हिंदी चित्रपट विविध वैशिष्ट्यांनी सजलेला आहे. आध्यात्म, गुरूभक्ती, क्रियायोग आणि श्रद्धा यांची प्रचिती देणाऱ्या गुरूमाई माँ रुद्रात्मिका यांच्या आध्यात्मिक प्रवासावर चित्रपट आधारित आहे. या हिंदी चित्रपटाच्या रूपात महावतार बाबाजी, श्री रामकृष्ण परमहंस, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, बाबा श्री कालभैरव, बाबा श्री भद्रबाहू, हेडाखान बाबा, माँ काली यांचे दर्शन आणि यासोबतच गुरुमाई माँ रुद्रात्मिका यांचा त्यांच्या गुरु कार्यासाठीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. २०२४ मध्ये गुरुमाईंना हा चित्रपट बनवण्याचा आदेश मिळाला होता. चित्रपट निर्मितीचा अनुभव नसतानाही मोठ्या धाडसाने आणि प्रचंड मेहनतीने विविध संकटांवर मात करत गुरुमाईंनी ‘फकिरीयत’ बनवला आहे. १९ सप्टेंबर रोजी ‘फकिरीयत’ संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
मराठी जेवण, गरिबांचे जेवण! विवेक अग्निहोत्रीने दिले स्पष्टीकरण; म्हणाला,”जेव्हा मला अक्कल…”
‘फकिरीयत’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्याला सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल तसेच अभिनेत्री-निर्मात्या मेधा मांजरेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यासोबतच ‘फकिरीयत’मधील कलाकार-तंत्रज्ञ आणि चित्रपटक्षेत्रातील इतर मान्यवर मंडळीनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती.
भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली ‘फकिरीयत’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे. ‘फकिरीयत’ची पटकथा अनिल पवार यांनी लिहीली असून, अनुजा जानवलेकर यांच्यासोबत पवार यांनी संवादलेखन केले आहे.
‘फकिरीयत’ या चित्रपटामध्ये उदय टिकेकर, संदेश जाधव, विनीत शर्मा, अक्षय वर्तक, नयन जाधव, संदेश जाधव, अनीषा सबनीस आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. दरम्यान अभिनेता संतोष जुवेकर पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे. मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी, नेहा राजपाल या गायकांच्या आवाजात चित्रपटाचे संगीत केले आहे. प्रवीण कुंवर यांनी गीतकार समृद्धी पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतसाज चढवला आहे. संकलन निलेश गावंड यांनी केले असून, डिओपी अजित रेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. १९ सप्टेंबर रोजी ‘फकिरीयत’ हा चित्रपट संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.