
श्रीमंत किंवा गरिब, उच्च निच्च कुळ जात असा कोणताही भेदभाव न होता माणसाचा जन्म होतो पण वाट्याला येणारी परिस्थिती आणि आलेलं जगणं प्रत्येकवेळी भेदभाव करतो हे नक्की. काही माणसांचा संघर्ष हा जन्माला आल्यापासून सुरु होतो त्यातलाच हा लोककलाकार हलधर नाग. ओडिशाच्या हालाकीची परिस्थिती असलेल्या घरातला हलधर यांचा जन्म. लहानपणीच आई वडिल गेल्याने हलधर चणे विकून स्वत: चं पोट भरायचे. जिथे दोन वेळेच्या जेवणाचाच प्रश्न तिथे शिक्षण तर लांबचीच गोष्ट होती. हलधर शाळेत कधीच गेले नाही पण आज ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित लोककवी आहेत.
1950 मध्ये ओडिशाच्या बारगढ जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेले हलधर नाग हे ‘कोसली’ भाषेतील प्रसिद्ध ओडिया लोककवी आहेत. जसं तुमचा जन्म हा गरिब किंवा श्रीमंत यावरुन ठरत नाही तसंच कला देखील श्रीमंत गरिब पाहून अवगत होत नाही. वाट्याला येणारी परिस्थिती या सगळ्यात कविता करण्याचा हलधर यांना छंद जडला आणि हीच नांदी ठरली त्यांच्या नव्या प्रवासाची. आपण जे जगलो आणि आपल्याबरोबर असलेले जे जगत आहे त्या व्यथा, तिथली संस्कृती, तिथलं राहणीमान, तिथला निसर्ग आणि समाजातील वास्तवावर आधरित त्यांच्या अनेक कविता या ‘कोसली’ या स्थानिक ग्रामीण भाषेत उपलब्ध आहेत. साध्या जीवनातून मिळालेला अनुभव आणि जमिनीशी जोडलेला जीवनदृष्टीकोन त्यांच्या कवितांमध्ये ठळकपणे दिसून येतो.
असं म्हणतात ना जे चांगलं असतं त्याची दखल कधी ना कधी घेतली जाते. 2016 मध्ये भारत सरकारने हलधर यांना लोक साहित्यातील मोलाच्या कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करून सन्मानित केलं. साध्या वेशातला, पायात चप्पल देखील नाही असा साधी राहणी असलेला माणूस जेव्हा पुरस्कार स्विकारण्यासाठी मंचावर गेला तेव्हा अनेकांचं लक्ष त्यांच्यावर खिळून राहिलं. पद्मश्री पुरस्कारासाठी जेव्हा हलधर यांना फोन केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की साहेब दिल्लीला येण्याइतपत माझ्याकडे पैसे नाहीत. हलधर त्यावेळी एका हॉटेलमध्य़े स्वयंपाकी म्हणून काम करत होते. फक्त एवढंच नाही तर पद्मश्री पुरस्कारादरम्यान मिळालेल्या मानधनातील 10 हजार रुपये हलधर नाग यांनी हे पैसे अनाथ आश्रमाला दान केले, असं साधं राहणाऱ्या माणसाचं देशभरात कौतुक होत आहे.