सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद तिच्या बोल्ड आणि हटके लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र उर्फी तिच्या याच हटके अंदाजामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी जावेदला वारंवार बलात्काराच्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उर्फीने काही दिवसांपूर्वी या तरुणांबद्दल गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ज्यानंतर पोलिसांनी बिहारमधील (Bihar) पाटणा येथून नवीन गिरी नावाच्या तरुणाला अटक केली.
पाटणामधून आरोपीला अटक :
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहिती नुसार, आरोपी व्हॉट्सअॅप कॉलवर उर्फी जावेदला सतत अश्लील भाषेचा वापर करून धमकी देत आहे. तसेच उर्फी म्हणाली की, आरोपी तिच्या फॅशन स्टाइलवरही आक्षेप घेत होता, अशी तक्रार उर्फीने केली होती. तांत्रिक तपास केल्यानंतर पाटणा शहरातील नवीन गिरी नावाचा तरुण धमकावत असल्याचे आढळून आले. यानंतर मुंबई पोलिसांनी पाटणा गाठून त्याला अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पाटणा कोतवाली पोलिसांच्या मदतीने आरोपी नवीन गिरी याला हॉटेलमधून अटक करून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे उर्फीने इंस्टाग्रामवर सांगितले होते की, नवीन हा तीन वर्षांपूर्वी तिचा ब्रोकर होता आणि त्याच्याकडे उर्फीचा फोन नंबरही होता. आता अचानक त्याने त्या नंबरवर मेसेज पाठवून धमक्या देण्यास सुरुवात केली. नवीन हा त्या नंबरवर कॉल करून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकीही देत होता. उर्फीने तिच्या तक्रारीसोबत कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांना दिले होते.
वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत होता आरोपी :
नवीन गिरी हा उर्फी जावेदला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून धमकावत असे. पुरावा म्हणून अभिनेत्रीने नवीनचे कॉल रेकॉर्डिंग दिले होते, त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध आयटी अॅक्ट आणि धमकावण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात नवीन हा रिअल इस्टेट ब्रोकर असल्याचे उघड झाले असून, त्याने उर्फीला भाड्याने फ्लॅट मिळवून दिला होता. आरोपीने दावा केला आहे की, उर्फीने त्याचे कमिशन दिले नाही, ज्यामुळे तो अभिनेत्रीला व्हॉट्सअॅपवर वारंवार कॉल करून धमकावत असे. इतकेच नाही तर नवीनने इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर उर्फीविरोधात अपशब्दही लिहिले होते.