फोटो सौजन्य - Social Media
अॅमेझॉन एमएक्स प्लेयर या लोकप्रिय मोफत स्ट्रीमिंग सेवेनं ‘हाफ सीए’ या चर्चित मालिकेच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सीए होण्याचं स्वप्न, मेहनत, त्याग आणि संघर्ष या सगळ्यांचा जिवंत अनुभव या सीझनमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे. 27 ऑगस्टपासून ही मालिका मोफत स्ट्रिमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
पहिला हंगाम जिथे संपला तिथून कथा पुढे सरकते. आर्ची मेहता (एहसास चन्ना) तीन वर्षांच्या आर्टिकलशिप आणि व्यग्र अभ्यास यात समतोल साधण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे नीरज गोयल (ग्यानेंद्र त्रिपाठी) सीएच्या अंतिम परीक्षेच्या शेवटच्या प्रयत्नासाठी सज्ज होतो. परंतु यशाचा मार्ग सोपा नाही; भूतकाळाचा छळ, भावनिक अडथळे आणि कठीण निर्णय त्यांचा प्रवास अधिक गुंतागुंतीचा करतात. ‘हाफ सीए सीझन 2’ मध्ये प्रीत कमानी, ऐश्वर्या ओझा, अनमोल कजानी आणि रोहन जोशी यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. मालिकेचं दिग्दर्शन प्रतीश मेहता यांनी केलं असून लेखन ततसत पांडे, हरीश पेड्डिंती आणि खुशबू बैद यांनी एकत्रितपणे केलं आहे. निर्मितीची जबाबदारी ‘द व्हायरल फीवर’कडे आहे.
अमेझॉन एमएक्स प्लेयरचे कंटेंट हेड अमोघ दुसाद म्हणाले, “हाफ सीए ही केवळ मालिका नाही, तर ती महत्वाकांक्षा, मैत्री आणि अथक प्रयत्नांची खरी कहाणी आहे. सीझन 2 मध्ये प्रेक्षक पात्रांच्या जीवनात खोलवर जातील, जिथे आव्हाने आणखी मोठी आणि क्षण अधिक भावनिक असतील.” द व्हायरल फीवरचे प्रेसिडेंट विजय कोशी यांनी सांगितलं की, “सीए विद्यार्थ्यांचं जग क्वचितच पडद्यावर इतक्या प्रामाणिकपणे दाखवलं जातं. हाफ सीए सीझन 2 मध्ये आर्ची आणि नीरजला कठीण निवडींचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक थरारक होतो.”
कलाकारांच्याही भावना वेगळ्या आहेत. आर्चीची भूमिका साकारणारी एहसास चन्ना म्हणाली, “हा सीझन थकवा, दबाव आणि आत्मशंकेतूनही स्वप्नाचा पाठलाग करण्याचा संघर्ष दाखवतो. सीए विद्यार्थ्यांना ही कथा जवळची वाटेल.” तर नीरजच्या भूमिकेत ग्यानेंद्र त्रिपाठी म्हणाले, “अंतिम प्रयत्नातला ताण, मैत्री, एकटेपणा आणि पुन्हा उभं राहण्याचं धैर्य या सर्व भावना या सीझनमध्ये प्रभावीपणे दिसतात.” ‘हाफ सीए सीझन 2’ ही मालिका 27 ऑगस्टपासून अमेझॉन एमएक्स प्लेयरवर मोफत स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. मोबाइल, कनेक्टेड टीव्ही तसेच अमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, गुगल टीव्ही, शाओमी टीव्ही, फायर टीव्ही आणि एअरटेल एक्सट्रीमवरही प्रेक्षक हे मोफत पाहू शकतील.