फोटो सौजन्य - Social Media
विजय तेंडुलकर यांच्या लेखणीने समृद्ध झालेले नाट्य ‘सखाराम बाईंडर’ मराठी नाट्यसृष्टीमधले महत्वाचे योगदान आहे. १९७२ साली या नाटकाचे प्रथम सादरीकरण करण्यात आले होते, त्यानंतर या नाटकाचे अनेक प्रयोग राज्यभरात झाले. या नाटकाचे चाहते संपूर्ण जगभरात पसरले आहे, कारण विजय तेंडुलकर हे नाव फार मोठे आहे. या नाटकामध्ये स्त्री-पुरुष संबंधांचे वास्तववादी चित्रण करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे अभिनेते सयाजी शिंदे त्यांच्या अभिनयाने ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा जिंवत करणार आहेत. रसिक प्रेक्षकांना ‘सखाराम बाईंडर’ची पुन्हा जिंवत अनुभूती पाहायला मिळणार आहे.
यावेळी अभिनेते सयाजी शिंदे नाटकातील मुख्य पात्र साकारणार आहेत. सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या नाटकाच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले होते. पुण्यात हे कार्यक्रम झाले आहे. ‘सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्’ या निर्मिती संस्थेचे हे तिसरे नाट्यपुष्प आहे. अभिजीत झुंजारराव यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून हे नाटक पुन्हा रंग भूमीवर आणण्यामागचे हेतू त्यांनी स्पष्ट केले आहे. विजय तेंडुलकरांची लेखणी आजच्या पिढीपर्यंत पोहचवणे आणि त्यांच्या ख्यातीची नव्या पिढीला जाणीव करून देणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. या नाटकात सयाजी शिंदे, नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे तसेच स्वतः दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव अभिनय करणार आहेत.
मनोहर जगताप यांनी या नाटकाची निर्मिती केली असून, निखिल जाधव यांनी या नाटकाची कार्यकारी निमिर्ती केली आहे. या नाटकाला संगीत आशुतोष वाघमारे यांनी दिले आहे, तर नेपथ्य सुमित पाटील यांनी केले आहे. प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांनी केले आहे. तर रंगभूषा शरद सावंत यांनी केले आहे. नाटकाची वेशभूषेची कमान तृप्ती झुंजारराव यांनी सांभाळली आहे.
‘सखाराम बाईंडर’ सारखे अजरामर नाटक पुन्हा रंगभूमीवर झळकणार त्यामुळे नवं पिढीतही उत्साह दाटून आला आहे. नाटक पाहण्यासाठी अनेकांचे डोळे आतुरलेले आहेत.