Meat banned in Maharashtra on 15 august independence day by mahayuti government
14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत कोणताही प्राणी कत्तल करू नये किंवा मांस विक्री करू नये, असे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार कलम ३३४, ३३६ आणि ३७४ (अ) अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्री करणाऱ्या दुकानांवर बंदी असल्याचे जाहीर केले. याविषयी सर्वप्रथम KDMC ने आदेश जारी करत 15 ऑगस्टच्या दिवशी मांस-मटण विक्रीवर बंदी असल्याचे जाहीर केले होते. इथून वादाची सुरुवात झाली.
याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूरमध्ये देखील हा फतवा काढण्यात आला आहे. नागपूर महापालिकेने 15 ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीला चिकन मटण दुकान आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहेत.
स्वातंत्र्यदिनी मांसाहार करण्यावर मालेगाव पालिकेने देखील बंदी घातली आहे. इतर पालिकांप्रमाणे मालेगावमध्ये देखील ही बंदी लागू करण्यात आली आहे.
मांसविक्री करण्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहेत.
अमरावती येथील पालिकांनीही 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचं कारण देत मांस विक्रीवर बंदी घालत तसे निर्देश दिले आहेत. यामुळे अनेकांचा हिरमोड देखील झाला आहे.
स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात मांसाहार विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिकेचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी काढले आहेत.