अंकुरलेला बटाटा खावं की टाळावं? ( फोटो सौजन्य - Social Media )
अंकुरलेल्या बटाट्यांमध्ये सोलनिन आणि चाकोनिन हे दोन विषारी घटक तयार होतात. हे घटक शरीरात गेल्यास उलटी, पोटदुखी, जुलाब, डोकेदुखी, चक्कर येणे, ताप, कमी रक्तदाब, तसेच मज्जासंस्थेवर परिणाम अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात.
दीर्घकाळ सेवन केल्यास या विषारी द्रव्यांचा परिणाम शरीरावर अधिक तीव्र होतो.
फक्त आरोग्याच्याच नव्हे तर चवीच्याही दृष्टीने अंकुरलेले बटाटे हानिकारक असतात. अशा बटाट्यांची चव कडू लागते आणि त्यातील जीवनसत्त्वे तसेच पोषक घटक कमी होतात. त्यामुळे अनेकदा चांगलं अन्नदेखील अशा बटाट्यांमुळे अपाच्य किंवा विषारी ठरू शकतं.
त्यासाठी बटाटे साठवताना काही साधे नियम पाळावेत. त्यांना नेहमी थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागी ठेवा. ओलसर ठिकाणी ठेवल्यास बटाटे लवकर अंकुरतात. तसेच, एकावेळी खूप मोठ्या प्रमाणात बटाटे खरेदी करू नका; फक्त एक ते दीड आठवड्यात संपतील इतकेच घ्या.
लक्षात ठेवा.बटाटा कितीही आवडता असला तरी अंकुरलेला किंवा हिरवा बटाटा खाणं म्हणजे आरोग्याशी खेळ करणं होय. सुरक्षित साठवण आणि योग्य निवड हेच निरोगी आहाराचं पहिलं पाऊल आहे.