मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. अश्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत दाखवलेल्या ऑडिओ क्लिपमुळे अनेकांना धक्का बसला आहे. या कथित ऑडिओ क्लिपचे सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. यावरून आता महायुतीमध्येच तुतुमैमै व्हायला सुरवात झाली असल्याचे दिसत आहे. मंत्री उदय सामंत यांनी या ऑडिओ क्लिपवरून भाजप संबंधित व्यक्ती जबाबदार असल्याचे म्हटल्यानंतर आत भाजप नेते आशिष शेलार यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे.
या कथित ऑडिओ क्लिप वादावर आता भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली असून आशिष शेलार यांनी याप्रकरणात प्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Ashish Shelar)
मनोज जरांगे यांनी असा दावा केला की, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत 500 कोटी रुपये दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या नेत्यांना सांगितल्याची कुजबूज पक्षात सुरू आहे. या दाव्यानंतर जरांगे यांनी काही कथित ऑडिओ क्लिप समोर आणल्या. या क्लिपमध्ये जरांगे यांच्याबाबत चर्चा होत असल्याचं निदर्शनास येत आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी संबंधित क्लिपमधील व्यक्ती भाजपाशी संबंधित असल्याचा दावा केल्याचं वृत्त आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत या क्लिपशी भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे हे मित्रपक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्याबाबत अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करणं भाजपाला मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
क्लिपची सत्यता तपासलेली नाही आणि तिच्या विश्वासार्हतेबाबत स्पष्टता नाही, अशी भूमिका शेलार यांनी मांडली. जर क्लिपबाबत उदय सामंत यांचा काही गैरसमज झाला असेल, तर तो दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही त्यांनी म्हटलं. जरांगेंकडे उपलब्ध असलेली माहिती तपास यंत्रणांना द्यावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोप सुरू व्हायला सुरुवात झाली आहे, तरी कथित ऑडिओ क्लिपमधील आवाजांची ओळख, क्लिपची सत्यता याबाबत चौकशी होणे बाकी आहे. त्यामुळे आता चौकशीतून नेमकं काय समोर येतं, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.






