Dhananjay Munde Resignation BJP MLA Suresh Dhas Reaction Maharashtra Political News
परळी : बीड हत्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरणातील एका आरोपी फरार आहे. या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बीड हत्या प्रकरणानंतर आता महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये देखील सुरेश धस यांनी लक्ष घातले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती. महायुतीमध्ये असून देखील त्यांनी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. मात्र धनंजय मुंडे व सुरेश धस यांच्यामध्ये भेट झाल्यामुळे जोरदार टीका करण्यात आली. सुरेश धस यांच्यावर इतर नेत्यांनी टिकास्त्र डागले. मात्र या टीकेनंतर पहिल्यांदाच सुरेश धस यांनी मज्जाजोग गावी जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर आमदार सुरेश धस यांनी परळीमध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुरेश धस यांनी परळीमध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली आहे. यावेळी आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांना धीर दिला. मुंडे कुटुंब यावेळी भावुक झाले होते. “महादेव मुंडे यांचा मर्डर झाला त्याठिकाणीची गाडी जाते आणि बॉडी जागेवर राहाते. भास्कर केंद्रे, सचिन सानप, गोविंद भताने या पोलिसांची वारंवार या प्रकरणात नावं येतात, या प्रकरणात पोलिसांचा हात आहे का?” असा सवाल यावेळी सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.
सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. आमदार सुरेश धस म्हणाले की, “आकाच्या लोकांनी हा प्लॉट घेतला आहे, नेमका त्यांचा यात हात आहे का? किड्या मुंग्यांसारखी लोक परळीत मारली जातात आणि हे म्हणतात परळीला बदनाम करत आहे. आज पंधरा महिने झाले हत्येचा तपास उलगडत नाही, पोलीस तपासाला आहेत का कशाला? परळीत या 35 लाख द्या आणि खून करा अशी परिस्थिती आहे. महादेव मुंडे यांचा प्लॉट ज्यांनी घेतला तो प्लॉट नंतर कोणाच्या नावावर झाला हे पाहावे लागेल. या प्रकरणात चार पाच पोलिसांची नावे समोर येत आहेत. भास्कर केंद्रे 15 वर्षे, सचिन सानप हे 10 वर्ष झाले इथेच आहेत. परळीतील पोलिसांनी खून झाल्यावर गाडी नेली पण बॉडी तिथेच ठेवली. याचा अर्थ पोलिसांनीच त्यांना मारले कां?” असा सवाल सुरेश धस यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आका असा उल्लेख केला आहे. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार सुरेश धस म्हणाले की, “100 टक्के यात आकाचा संबंध आहे, किंवा मग पोलिसांनीच याला मारले. रात्री 8 वाजता कोर्टासमोर महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला. या प्रकरणात आकाच्या आकाचा हात नसेल मात्र आकाचा हात नक्की असेल,” असं म्हणत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा नाव न घेता वाल्मिक कराडवर निशाणा साधला आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाबरोबरच महादेव मुंडे यांच्या हत्येचे प्रकरण चर्चेत येणार आहे.