BJP Mumbai President Amit Satam criticizes Uddhav Thackeray's speech as rotten
Shivsena Dasara Melava : मुंबई : दसरा मेळाव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत सुरु झाली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंकजा मुंडे आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे झाले आहेत. यामधील उद्धव ठाकरे यांचे भाषण हे सडकं आणि नासलेलं असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर भाषण केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना भगवा पांघरलेले गाढव असा केला तर महायुती सरकारचा उल्लेख बिनडोक सरकार म्हणून केला आहे. उद्धव ठाकरे यांनी भरपावसामध्ये दसरा मेळावा घेत शिवसैनिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर भाजप पक्षाचा कमळाबाई असा उल्लेख करत जोरदार टीकास्त्र डागले. भाजपचे हिंदूत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना तुमचे नक्की हिंदूत्व काय असा सवाल करत अनेक घटनांचा उल्लेख केला. मात्र उद्धव ठाकरे यांचे तेच तेच भाषण हे आता सडलेले आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंचं एक सडकं आणि नासलेलं भाषण झाले. हिंदुत्व सोडल्यानंतर गर्दी कशी कमी होते याचा एक उत्कृष्ट उदाहरण आणि दृश्य आज शिवाजी पार्क वरती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेला आहे आणि आपल्या वडिलांकडून आपण हिंदुत्वाचे धडे घेतले नाहीत म्हणून तुमची ही अवस्था झालेली आहे नाहीतर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना तुमच्या 54 पैकी 44 आमदार तुम्हाला सोडून गेले नसते,” असा टोला अमित साटम यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले की, “तुम्ही हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर गेल्यामुळेच पक्षाची आणि नेतृत्वाची आज दयनीय अवस्था झाली. कोविडमध्ये मुंबईकर म्हणत असताना तुम्ही बेस्ट सीएम कसे झालात? हे कसं मॅनेज करून घेतलं, याची थोडीशी माहिती आपण महाराष्ट्राच्या जनतेला दिली असती तर बरं झालं असतं,” असा देखील टोला भाजपच्या मुंबई प्रदेशाध्यक्षांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये रावण दहन देखील केले जाते. यंदा देखील भरपावसामध्ये रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला. मात्र यंदा ठाकरे गटाचे रावणदहन हे विशेष होते. याचे कारण म्हणजे यंदा ठाकरे गटाने डोके नसलेला रावण जाळला आहे. उद्धव ठाकरे यांनी रावणाबद्दल सांगताना हा रावण महायुतीच्या सरकारप्रमाणे बिनडोक्याचा असल्याचे म्हणत टोला लगावला. यावर उत्तर देताना अमित साटम म्हणाले की, “तुमच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते, तुमच्या उमेदवाराबरोबर आरोपी प्रचार करत होता, हे तुमचे हिंदुत्व. त्यामुळे तुमची आज ही अवस्था झालेली आहे. यापुढे मुंबईतील नाक्या नाक्यावर आणि कट्ट्या कट्ट्यावर चर्चा होणार, ती फक्त तुमच्या भ्रष्टाचाराची आणि राजकारणाचीच. तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाचा आणि मतांच्या रावणाचं दहन होणार म्हणजे होणारच”,अशा शब्दांत जोरदार प्रत्युत्तर दिले.