
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीत केला नवा विक्रम; वसंतराव नाईकांचा रेकॉर्ड मोडणार?
प्रदूषणाचा आणि पाण्याचा असे दोन्ही प्रश्न घेऊन दिवाळीचा सण यंदा आला होता. राज्याच्या जवळपास ९० टक्के भागांत शेतीसाठी पाणी नाही. पिण्यासाठी पाणी पुरेल की नाही याची तीव्र चिंता आहे. दुष्काळाचे मोठे संकट राज्यावर घोंघावते आहे. शेतकरी अडचणीत आल्यामुळे राज्य सरकारने दिवाळी सणा आधी मदत म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजारांची रक्कम पोचवली. विरोधकांनी अर्थातच त्यावर, “तुटपुंजी मदत”, “शेतकऱ्यांची थट्टा,” अशी टीका केली.
दुष्काळाच्या सावटातील ही दिवाळी कमी प्रमाणात साजरी होईल असे जर कोणाला वाटले असले तर तो गैरसमजच ठरला. मुंबई पुण्या पासून, सोलापूर नागपूर पर्यंतची सारी शहरे ९, १० आणि ११ नोव्हेंबर या दिवाळीच्या मुख्य दिवसात फटाक्याच्या विषारी धुराने भरून गेली होती. फटाक्यांचा आवाजही प्रचंड दुमदुमत होता. सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांना बंदी, वगैरे नियम आणि बंधने कोणीच पाळताना दिसत नव्हते. पुण्यासारख्या शहरात फटाक्याच्या धुरामुळे श्वास घेणे अशक्य बनले. गावात दुष्काळाची चाहूल आहे. शेतात उभी पिके करपून गेली आहेत. पण शहरांत मात्र लक्ष्मीपूजनाचा उत्साह ओसंडून वाहातो आहे असे चित्र होते.
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राजकीय शहाणपणा व संवेदनशीलता दाखवून सर्व मंत्र्यांना आदेश दिला की यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या घरी साजरी करावी. ते स्वतः नागपूर जिल्ह्यातील लोहारा सावंगी या खेड्यात गेले व बाळपांडे या शेतकरी कुटुंबाकडे राहिले. पाडव्याच्या दिवशी मुंबईत वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की प्रत्यक्ष लोकांत जाऊन राहणे बोलणे, याचा फायदा होतो. मी राहिलो तो भाग संत्र्याचा आहे. लोकांनी सांगितले की संत्र्याचेही पाणी तुम्ही बंद केलेत तर ती झाडे मरून जातील व नंतर तुम्ही प्रती झाड वगैरे मदत द्याल, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण नवी लागवड केल्यावर आठ वर्षांनी संत्री लागतील. यावर उपायही शेतकऱ्यांनीच सुचवला. त्या सूचनेवर मी लगेच अंमल केला. फळबागांच्या बोअर वेलवरील निर्बंधांत १५ डिसेंबर पर्यंत सवलत देण्याचे सुधारित आदेश निघाले.
शेतकऱ्यांच्या घरी जाऊन राहणे, गावात मुक्काम करणे ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलीच भावली. त्यांनी फडणवीसांचे त्यासाठी जाहीर अभिनंदन केले. पंतप्रधानांनी केलेले कौतुक व घेतलेली दखल, म्हणजे देवेन्द्र फडणवीस यांच्या, (आधीच अनेक तुऱ्यांनी भरलेल्या!) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा होता !
महाराष्ट्रात काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीची पंधरा वर्षांची सत्ता भाजपाचे प्रांताध्यक्ष असणाऱ्या फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाने संपवली. त्याला आता बारा वर्षे झाली. तेंव्हापासून मुख्यमंत्रिपदावर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम करण्याकडे फडणवीसांची वाटचाल सुरु राहिली आहे. तो विक्रम वसंतराव नाईकांच्या नावे अद्यापी अबाधित आहे. सलग ११ वर्षे दोन महिने राज्याचे नेतृत्व करताना नाईकसाहेब ४०९६ दिवस मुख्यमंत्री पदावर (१९६३ ते १९७५) काम केले. त्यांच्या नंतर मनोहर जोशी सलग १४३८ दिवस मुख्यमंत्री राहिले. तो विक्रम फडणवीसांनी २०१९ मध्ये मोडला. तोवर ते सलग १८३८ दिवस पदावर होते.
शरद पवारांनी चार वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ते एकूण २४१२ दिवस मुख्यमंत्री राहिले. तो विक्रम आता तिसऱ्यांदा पदाची शपथ घेतल्यनंतर फडणवीसांनी मोडला आहे. परवाच्या दिवाळी पर्यंत त्यांनी राज्याचे नेतृत्व एकूण २५५० दिवस केले आहे. २०२९ च्या निवडणुकीपर्यंत आणखीही दोन वर्षांचा काळ या पदावर राहण्याची संधी फडणवीसां पुढे आहे. “मी परत येईन,” असे त्रिवार जाहीर करून २०१९ च्या निवडणुकीला सामोरे जाताना फडणवीसांनी पुन्हा एकदा भाजपाचे शंभराहून अधिक आमदार निवडून आणले. तोही एक विक्रमच ठरला आहे. काँग्रेस राजवटीत काही नेत्यांनी तो पराक्रम केला. पण विरोधी पक्षात राहिलेल्या नेत्याने असा पराक्रम करण्याचे फडणवीसांसारखे काम शरद पवारांनाही कधीच जमले नव्हते. काँग्रेसमधील बाहेर पडल्या नंतर पवारांच्या आमदारांची संख्या ५०-६० पेक्षा अधिक कधीच राहिलेली नाही.
या दिवाळीत फडणवीसांनी आणखी एक विक्रमही केला आहे. त्यांनी वर्षा बंगल्यावरील आपली सातवी दिवाळी यंदा साजरी केली आहे! हेही नाईकसाहेबांनंतर कोणाला जमलेले नाही ! २०१४ च्या नोव्हेंबरमध्ये मध्ये ते प्रथम मुख्यमंत्री झाले, त्या वर्षी दिवाळी ऑक्टोबरमध्ये आली होती. २०१९ ची त्यांची वर्षावरील सलग पाचवी दिवाळी होती. त्यानंतर ते पाच वर्षे सागर बंगल्यावरच राहिले. आधी ठाकरेंच्या राजवटीतील विरोधी पक्ष नेता व नंतर शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारमधील उपमुख्यमंत्री.
२०२४ च्या निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्री बनले पण जवळपास सहा महिने वर्षावर राहायला गेले नव्हते. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंगला रिकामा केला नव्हता आणि लेकीची दहावीची परीक्षा झाल्यानंतरच वर्षावर जाण्याचे फडणवीस कुटुंबाचे ठरले होते. त्यामुळे एप्रिल २०२५ नंतर फडणवीसांनी सागरवरील मुक्काम हलवला. सहाजिकच मागची २०२५ ची व यंदाची असा दोन दिवाली त्यांनी वर्षावर साजऱ्या केल्या. या पुढे किमान २०२९ च्या दिवाळी सणा पर्यंत तरी वर्षावर राहण्याची संधी फडणवीसांना नक्कीच आहे. त्यामुळे आणखी तीन दिवाळी सण ते वर्षावर काढतील यात शंका असायचे कारण नाही. तेव्हा त्यांनी वर्षावरील दहावी दिवाळी साजरी केलेली असेल. म्हणजेच वसंतराव नाईकांच्या विक्रमाच्या जवळपास ते पोचतील. २०२९ ची निवडणूक झाल्यानंतर जर पुन्हा भाजपाचेच सरकार सत्तेत आले तर त्यांना नाईकसाहेबांचा विक्रम मोडण्याचीही संधी मिळू शकेल…!!
वसंतराव नाईक हे वर्षावरचे प्रथम आणि आजवरचे सर्वाधिक काळ मुक्काम केलेले मुख्यमंत्री आहेत. ते राज्याचे चौथे मुख्यमंत्री होते. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सह्याद्री बंगल्यावर राहात असत. १९९० च्या दशकात जुना सह्याद्री बंगला पाडला गेला. तिथे याच नावाचे आलीशान असे राज्य अतिथीगृह उभे ठाकले आहे.
चव्हाणसाहेब दिल्लीला संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर राज्याची जबाबदारी मारोतराव कन्नमवार यांच्याकडे दिली होती. त्यांच्या अकाली निधनानंतर पी. के. सावंतांकडे दहा दिवस हे पद तात्पुरत्या स्वरुपात गेले. नंतर वसंतराव नाईकांची रीतसर निवड ५ डिसेंबर १९६३ रोजी झाली. नाईक हे आधी कृषीमंत्री म्हणून वर्षावरच राहात असत. या बंगल्याचे ब्रिटिशकालीन नाव होते, “डग बिगन.” त्याचे नामांतर “वर्षा” असे नाईकांनीच केले. मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी निवासस्थान बदलले नाही. त्यांच्या नंतर हे पद शंकरराव चव्हाणांकडे आले. ते मुख्यमंत्री झाल्यावर वर्षावर राहायला लागल्याने वर्षाला मुख्यमंत्री निवास हा दर्जाच मिळाला.
पदग्रहण करणाऱ्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी वर्षावर राहण्याची प्रथाच पडली. बदलत्या गरजांनुसार वर्षाची सुरक्षा व्यवस्था मजबूत झाली. मुख्यमंत्र्यांचे निवासी कार्यालय तिथे उभे राहिले. आता कॅबिनेट बैठकांचीही सोय वर्षावर आहे. शेजराचा तोरणा बंगलाही गेल्या वीस वर्षांपासून वर्षा संकुलातच समाविष्ठ झाला आहे.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वर्षाच्या मागील मोठ्या हिरवळीवर दिवाळीचा समारंभ होत असे. अलिकडे असे समारंभ समोरच्या भागात मांडव घालून केले जातात. उद्धव ठाकरे यांच्या कालावधीत सुरक्षेच्या कारणांस्तव वर्षा निवासस्थानाचे दरवाजे सर्वांसाठीच सर्व काळ बंद राहात. फडणवीस यांचा पहिला कार्यकाळ आणि दुसरा कार्यकाळ यातही वर्षावरच्या पद्धती बदलेल्या दिसतात. दिवाळीमध्ये मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर माध्यम प्रतिनिधींना बोलावणे ही प्रथाही तशी जुनीच आहे.
विलासराव देशमुखांच्या काळा पर्यंत या गाठी भेटी नेहमीच अनौपचारिक असत. नंतर काळ बदलला. माध्यमांचे स्वरूप आणि गरजाही निराळ्या झाल्या. माध्यम प्रतिनिधींची वाढती संख्या हाही प्रश्न होता. पूर्वी अशा भेटीत गमतीदार प्रश्न व त्यांना दिलेली मजेदार उत्तरे असत. आता त्याला पत्रकार परिषदेसारखे रूप येते.
पाडव्याला फडणवीसांनी माध्यम प्रतिनिधींना दिलेली भेटही औपचारिक पत्रकार परिषद बनली. देवेंद्र फडणवीस यंनी वर्षा बंगल्यावर व्यतीत केलेल्या सात दिवाळी सणांपैकी २०१९ च्या दिवाळी कार्यक्रमाच्या आठवणी स्वतः मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हेही विसरलेल नसतील. पत्रकारांशी बोलताना तेंव्हा फडणवीसांनी जाहीर केले होते की, “उद्धव ठाकरे त्यांचे फोनच घेत नाहीत!” तो काळ राजकीय अस्वस्थतेचा, अनिश्चिततेचा होता. निवडणुकांचे निकाल लागले होते पण नव्या सरकार कसे बनेल याची स्पष्टता नव्हती.
उद्धव ठाकरेंनी निकालाच्याच दिवशी जाहीर करून टाकले होते की त्यांच्यापुढे, “भाजपा सोबत सरकार स्थापन करणे हा एकच पर्याय नाही”! त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी स्वतःच जाहीर केले की ठाकरे त्यांचे फोन घेत नाहीत. त्यामुळे अस्थिरतेच्या शंकांची ब्रेकिंग न्यूज लगेचच सुरु झाली. ठाकरेंच्या गाठी-भेटी शरद पवार व काँग्रेस नेत्यांशी सुरु होत्या. बैठका जोरात होत्या. साकारणाऱ्या त्या महा विकास आघाडीला सुरुंग लावण्याचे काम फडणवीस व अजितदादांनी एका “मध्यरात्री” केले. खरेतर सकाळी ७ वाजता शपथविधी झाला होता. पण तो डाव रात्री रंगला होता. रात्रीचे सरकार म्हणूनच ते गाजले. ते सरकार ७२ तासातच कोसळले. त्याच्या आठवणी आजही फडणवीसांना खलतच असतील….!!
– अनिकेत जोशी