
लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून थेट सहकारमंत्र्यांना हटवले; सुनेत्रा पवार गटाला धक्का
लातूर : राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून हटवण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली. बँकेच्या संचालकपदावर ठरवून दिलेल्या मुदतीपेक्षा जास्त काळ राहण्याशी संबंधित नियमांचा आधार घेत ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
बाबासाहेब पाटील यांच्यासह 8 संचालकांच्या कार्यकाळाबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. बँकेचे सभासद आणि अधिकृत मतदार प्रतिनिधी सतीश शेषराव जाधव यांनी 25 मे रोजी आरबीआयकडे याबाबत तक्रार केली. लातूर जिल्हा बँकेच्या १९ सदस्यीय संचालक मंडळातील ८ सदस्य १० वर्षांहून अधिक काळ पदावर राहिल्याचा आरोप करत त्यांच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता; ज्यामध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाचाही समावेश होता.
दरम्यान, आरबीआयच्या कारवाईवर बाबासाहेब पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. 10 वर्षांच्या कार्यकाळाशी संबंधित कायदा आपल्या बाबतीत लागू होत नसल्याचा दावा त्यांनी केला. आरबीआयचा निर्णय चुकीचा असून, संचालक म्हणून आपण या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.