निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचा नाराजीचा सुर, राष्ट्रवादीत खलबतं सुरु; पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका
गिरीश रासकर / अहिल्यानगर: सध्या राज्यामध्ये निवडणुकीचे वातावरण चांगले तापले असून जागा वाटपावरून महाविकास आघाडी व महायुतीमध्ये चांगलीच खलबतं सुरू आहेत. यादरम्यान भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर करून बाजी मारली होती. त्यानंतर इतर पक्षांनी देखील उमेदवारांची यादी जाहीर केली. परंतु उमेदवार घोषित झालेल्या ठिकाणी आता सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. ज्या ठिकाणचे उमेदवार घोषित झाले आहेत त्या ठिकाणच्या इतर इच्छुक उमेदवारांनी बंडाचा पवित्रा घेतला असल्याचं दिसून येत आहे. या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीला यंदा बंडखोरांचा चांगलाच मनस्ताप होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही महाविकास आघाडी कडून लढण्यासाठी अनेक इच्छुकांनी वरिष्ठांकडे मोर्चे बांधणी केली होती. यात काही इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघांमध्ये प्रचार फेऱ्या, बैठका, सभा घेण्यास सुरुवात केली होती. परंतु महाविकास आघाडीमध्ये नगर जिल्ह्यात शरदचंद्र पवार यांचा दबदबा असल्याने शरद पवार गटाने जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सात जागांवर उमेदवार घोषित करून वर्चस्व निर्माण केले आहे. परंतु हे वर्चस्व निर्माण करताना शिवसेनेच्या वाट्याला फक्त दोनच जागा आल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर दिसून आला आहे. त्यामुळे नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील काही इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी सुरु केली आहे. अश्यात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवारांना मदत करतील की नाही? अशी चर्चा सध्या नगर शहरासह जिल्ह्यात सुरू आहेत.
नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ही पारंपरिक शिवसेनेकडे कायमच राहिली आहे. त्यामुळे शहरांमध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचे दिसून येते आहे. परंतु महाविकास आघाडीत शिवसेनेला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न होतो की काय? असा सवाल शिवसैनिक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारू लागले आहेत. ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचे वर्चस्व आहे अशा ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार रिंगणात न उतरवता इतर मित्र पक्षांच्या उमेदवारांना जागा देणे राष्ट्रवादीला तसेच शिवसेनेला देखील डोकेदुखी ठरू शकते.
2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मूळ पक्षात फूट पडून दोन गट तयार झालेत. या बदलत्या राजकारणाचा नगर जिल्ह्यावरही मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. कधी नव्हे ते ज्येष्ठ नेते शरद पवारांना माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या पाठोपाठ बाळासाहेब थोरात यांची लोकसभा निवडणुकीला मोठी साथ मिळाली. त्यामुळे नगर जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीला मिळवता आल्या. या नव्या राजकीय परिस्थितीचा परिणाम जिल्हा बँकेच्या राजकारणात देखील दिसून आला आहे.
दरम्यान कधीकाळी जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेला शिवसेना पक्ष या सर्व वर्चस्ववादी राजकारणामध्ये कुठेतरी बाजूला पडत चालला आहे का? असा प्रश्न शिवसैनिकांच्या मनात आता येऊ लागला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला खमक नेतृत्व नसल्याने कार्यकर्ते सध्या सैरभैर झाल्याचे दिसत असले तरी निष्ठावान शिवसैनिक आजही खमक्या नेतृत्वाच्या प्रतीक्षेत पहायला मिळतो आहे.
हेही वाचा-उरणच्या निवडणुकीत होणार काँटे की टक्कर ; तिसऱ्या आघाडीकडून ‘या’ नेत्याने भरला उमेदवारी अर्ज
लोकसभा निवडणुकीच्यावेळी नगर शहरातील तसेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकांनी पक्षाचा आदेश मानून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना साथ दिली. रात्रंदिवस दक्षिणेतील मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचे काम राष्ट्रवादीसह शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले. निलेश लंके यांच्या विजयामध्ये जसा राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा वाटा आहे, तसा प्रत्येकाला आपल्याला मतदारसंघात कधी ना कधी उमेदवारी मिळेल अशी देखील आशा आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या २५ वर्षापासून शिवसैनिकांची ताकद व शिवसेनेला मानणारा वर्ग मोठा आहे. स्व.अनिल राठोड यांच्यासह जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांनी जीवाचे रान करून जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवली हे सुद्धा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना मान्य करावे लागेल.
दरम्यान नगर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले तसेच पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी पारनेरमधून उमेदवारी न मिळाल्याने नाराजीचा सूर आवळत अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. पारनेर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भूमिकेनंतर आता नगर शहरातील पदाधिकाऱ्यांनी देखील बैठक घेत ही जागा शिवसेनेला द्यावी अन्यथा पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे पक्षाकडे सुपूर्द करू असा इशारा दिला आहे.
आक्रमक झालेल्या शिवसैनिकांमुळे राज्यातील समीकरणे बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. व त्याचा फटका ऐनवेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो अशी स्थानिक नेत्यांना कुजबुज लागल्याने त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या कानी तात्काळ घातल्याचे समजते. शिवसेनेच्या या आक्रमक पावित्र्यामुळे नगर जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये पुन्हा एकदा खलबतं सुरू झाली आहेत. येत्या दोन दिवसांत चुकीची दुरुस्ती करण्याची संधी असल्याचे बोलले जात आहे. नगर शहराची जागा ही जर पुन्हा मशालीला मिळाली व श्रेष्ठींनीच नगर शहरासाठी उमेदवार जाहीर केला तर त्याचा फायदा होऊ शकतो. जी काही नाराजी आहे दूर होऊ शकते. असं सांगितलं जात आहे.