अध्यक्ष पदाच्या वादानंतर सातारा जिल्हा परिषदेमध्ये पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वसाधारण सभा होणार आहे. सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सदस्य विविध विषयांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना या सभेसाठी आपल्या विभागाचा लेखाजोखा घेऊनच बसावे लागणार आहे.
हे देखील वाचा : कोरेगावात शंभूराज देसाईंची ‘चाल’ सुरु; महेश शिंदेंसमोर पर्याय उभा करण्याची रणनिती तापली
निवडीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
या सभेत सर्व विषय समिती सदस्यांच्या निवडी होणार आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून त्यासंदर्भात त्यांना निवडीबाबत विशेष प्रशिक्षणही दिले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड व विषय समिती सभापतीच्या निवडीवेळी झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहे. स्थायी समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, कृषी समिती, समाजकल्याण, शिक्षण व क्रीडा, बांधकाम, अर्थ, पशुसंवर्धन व दुग्धशाळा, आरोग्य, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य निवडीच्या अनुषंगाने ही विशेष सभा होणार आहे. या निवडीसाठी विस्तार अधिकाऱ्यांना मतदान अधिकारी क्रमांक १ तर कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांना मतदान अधिकारी क्रमांक २ म्हणून निवड केली आहे.
अध्यक्षांना स्थायी व जलसंधारण सभापतिपद तर समितीचे उपाध्यक्षांकडे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापतिपद देण्यात येणार आहे. याशिवाय उपाध्यक्ष व सभापतींना विषय समित्यांचा पदभार सोपवणे. विषय समित्यांवर सदस्यांची निवड करणे, विभागप्रमुखांना विषय समित्यांचे सचिव म्हणून निवड करणे आदी ३ विषय चर्चेला ठेवले आहेत.
हे देखील वाचा : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे बिगुल…! विधानपरिषदचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
जिल्हा परिषद सेस फंड निधी खर्चाचा विषय चर्चिला जाणार
जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक म्हणून कामकाज पाहत असताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी इमारतींसाठी अतिरिक्त निधी तरतूद करीत असताना जिल्हा परिषद सेस फंडाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांना सेस फंडामध्ये रक्कम शिल्लक नसल्याने निधीचा तुटवडा भासणार आहे. अशा परिस्थितीत प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने खर्च केलेले सेस फँडाचा विषय चर्चिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.






