शिवराजसिंह चौहान यांचे गंभीर आरोप (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
झारखंडः केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी (8 नोव्हेंबर) झारखंडमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात “राज्य प्रायोजित घुसखोरी” आपल्या राज्यासाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले. ते म्हणाले की “भारत ही धर्मशाळा नाही जिथे कोणीही येऊन स्थायिक होऊ शकेल”. हे घुसखोर राज्यातील आदिवासी मुलींना टार्गेट करून त्यांची लग्ने लावत असल्याचा आरोपही चौहान यांनी केला. त्यामुळे राज्याच्या सामाजिक रचनेवर परिणाम होत आहे असे गंभीर आरोप त्यांनी यावेळी लावले आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
JMM वर लावला आरोप
चौहान यांनी झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) नेतृत्वाखालील आघाडीवर घुसखोरांना व्होट बँक बनवल्याचा आरोप केला. या घुसखोरांना युती संरक्षण देत असल्याचे ते म्हणाले. तो त्यांचा मतदार यादीत समावेश करून घेत आहे आणि त्यांना आधारकार्ड आणि रेशनकार्डही काढत आहे. संथाल परगणा येथील आदिवासींची लोकसंख्या 44 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर आली असल्याचा दावाही चौहान यांनी केला.
इतकंच नाही तर चौहान यांनी भविष्यात नागरिकत्व नोंदणी करण्याचे आश्वासन दिले आहे. भविष्यात भाजपचे सरकार आल्यास नागरिकत्व रजिस्टर तयार करण्याचे आश्वासन चौहान यांनी दिले आणि सर्व परदेशी घुसखोरांना हाकलून लावले जाईल, असे सांगितले. ते म्हणतात की भाजप सरकार आदिवासी आणि इतर स्थानिक लोकांच्या सुरक्षेची खात्री करेल जेणेकरून त्यांची जमीन, पाणी आणि संसाधने सुरक्षित राहतील.
महिलांना दरमहा 2100 रुपये मानधन
शिवराज यांनी राज्यातील महिला कल्याण योजनांवरही प्रश्न उपस्थित केले आणि JMM च्या नेतृत्वाखालील सरकार प्रधानमंत्री आवास योजनेची योग्य अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप केला. या योजनेची योग्य अंमलबजावणी झाली असती तर महिलांना कायमस्वरूपी घरे मिळाली असती, असेही ते म्हणाले. यासोबतच निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यास महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता हे आश्वासन पूर्ण होतंय का हेदेखील पाहावं लागणार आहे. या निवडणुकीतही हे आश्वासन देण्यात आलं आहे.
झारखंड विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात
या मेळाव्यात शिवराज यांनी ‘घराला पाणी’ योजनेत 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की JMM सरकारने निवडणुकीच्या काळात महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची योजना सुरू केली तर भाजप निवडणुकीनंतर महिलांसाठी अधिक चांगल्या योजना आणेल. झारखंड विधानसभेची निवडणूक 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातदेखील 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक असून 23 नोव्हेंबर रोजीच मतमोजणी होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी झारखंड आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा निकाल लागणार आहे.