४२.३० लाख शेतकऱ्यांना ३ महिने मोफत धान्य
फसवणूक करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीला वेग
विद्यार्थी निर्वाह भत्त्यात वाढ व कर्मचारी सक्षमीकरण
Maharashtra Cabinet Decisions: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील आणि डीबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या राज्यातील ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति व्यक्ती एकूण पाच किलो मोफत धान्य दिले जाईल, यात ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू यांचा समावेश असेल.
आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी, एसईबीसी, ईडब्लूएस) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुधारित दराने भत्ता मिळणार आहे. भोजन, निवास, निर्वाह भत्त्यात कॅबिनेटने भरीव वाढ करण्यात मंजुरी दिली. याशिवाय शालार्थ प्रणालीत समाविष्ट असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
आरबीआयकडे नोंदणीकृत संस्थाच्या माध्यमातून वित्तीय सुविधा उपलब्ध होणार आहे. दरम्यान, खासगी अनुदानित शाळांच्या विनियमनांसाठी सर्वसमावेशक असा कायदा करण्यात येईल. त्यासाठी महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६ या विधेयकाच्या प्रारुपास मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक आगामी अधिवेशनात विधिमंडळात सादर करण्यात येईल.
कॅबिनेटने नंदूरबार जिल्ह्यातील नर्मदा तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. या अंतर्गत सहा वळण बंधाऱ्याचे नियोजन, यामाध्यमातून परिसरातील सुमारे २६ हजार ५२६ हेक्टरला सिंचनाचा लाभ तसेच ११.५० मे.दें. वीज निर्मिती होणार आहे.
आर्थिक फसवणुकीत सहभागी संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितांचे संरक्षण (वित्तीय आस्थापनांमध्ये) कायद्यातील सुधारणांनाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन केले जाणार असून, प्रकरणांचा 90 दिवसांत निपटारा करण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. याअंतर्गत महसूल न्यायालय प्रकरण व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. तसेच प्रकरणांचा लवकर निपटारा करण्यासाठी 'एक जिल्हा, एक अपील' यंत्रणेची तरतूद करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम्, २०२१ (एनसीएएचपी कायदा, २०२१) मधून अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळण्यात येणार, याबाबतच्या आवश्यक सुधारणा करण्याच्या विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी
शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयामधील पूर्ण वेळ ग्रंथपालाप्रमाणेव आता खासगी अनुदानित आयुर्वेद व खासगी अनुदानित युनानी महाविद्यालयातील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग, वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सुधारीत वेतन संरचना लागू करण्यास मंजुरी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अधिनियमातील तरतुदीसाठीच्या सुधारणेस मान्यता, त्याबाबतचा सुधारणा अधिनियम विधिमंडळासमोर मांडणार.