नरेश म्हस्केंनी घेतली भाजपच्या 'त्या' तिघांची नावं
मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात आधीच विविध विषयांवरून वाद निर्माण होत असतानाच या ऑडिओ क्लिपमुळे वादाची अधिकच ठिणगी पडली आहे. यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आल्याचे दिसत असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देत धक्कादायक विधान केलं आहे. (Manoj Jarange Audio Clip Controversy)
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेना खासदार यांच्यामार्फत जरांगे पाटलांना 500 कोटी दिले असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरूनच नरेश म्हस्के यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या ऑडिओ क्लिपमधील व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचं म्हंटल आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या तीन नेत्यांची नावे घेतली असून त्यांनी घेतलेल्या नावांमुळं आता राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हस्के यांनी या क्लिपच्या सत्यतेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना ही ऑडिओ क्लिप पोलिसांकडे आणि सायबर सेलकडे देण्याचं आवाहन मनोज जरांगे यांना केलं. क्लिपमधील आवाजांची सत्यता तपासली, तर या प्रकरणामागे नेमकं कोण आहे, हे समोर येऊ शकतं, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तसंच, जरांगे आणि शिवसेना यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत आहे, याचाही तपास व्हायला हवा, असं म्हस्के म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुराव्याशिवाय टीका करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
म्हस्के यांनी कथित क्लिपमधील आवाजांबाबत भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी, निधी कामदार आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या नावांचा उल्लेख केला. क्लिप खरी असेल आणि त्यात मित्रपक्षातील नेत्यांबाबत आक्षेपार्ह चर्चा असेल, तर वरिष्ठांनी त्याची दखल घ्यावी, अशी मागणीही म्हस्के यांनी केली आहे.
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या कथित क्लिपमध्ये महिलांचं संभाषण ऐकू येत आहे. त्यातील एका महिलेने जरांगे यांना श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 500 कोटी रुपये पोहोचल्याचा दावा केल्याचं ऐकू येत आहे. विधानसभा निवडणुकीतील जरांगेंच्या भूमिकेबाबतही संभाषणात चर्चा होत असल्याचं ऐकू येतआहे.
ही क्लिप खरी आहे की तिच्यात फेरफार करण्यात आला आहे, याबाबत सध्या ठोस निष्कर्ष काढता येत नाही. ती AI च्या मदतीने तयार करण्यात आली आहे का, हेदेखील तपासातूनच स्पष्ट होऊ शकतं.
त्यामुळे मूळ रेकॉर्डिंग, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या बाजू तपासल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येईल. आता या प्रकरणात अधिकृत चौकशी होते का आणि त्यातून काय निष्पन्न होतं, याकडे लक्ष लागलं आहे.
Ans: नरेश म्हस्के यांनी कथित ऑडिओ क्लिप पोलिसांकडे आणि सायबर सेलकडे देण्याचं आवाहन केलं. क्लिपची सत्यता तपासून त्यामागे कोण आहे, हे समोर आणण्याची मागणी त्यांनी केली.
Ans: नरेश म्हस्के यांनी या नावांचा उल्लेख केल्याचं वृत्त आहे. मात्र, क्लिपमधील आवाज संबंधित व्यक्तींचेच आहेत, याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
Ans: क्लिपची सत्यता आणि त्यातील व्यक्तींची ओळख स्वतंत्रपणे सिद्ध झालेली नाही.






