Nashik BJP Politics: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार असल्याचे दिसत आहे. येत्या रविवारी (२८ जुलै) भाजपकडून भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमधील अनेक माजी पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
शिवसेना (ठाकरे गट) चे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे हे अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि काही महत्त्वाचे पदाधिकारी देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर “येणाऱ्या काळात नाशिकसह राज्यात अनेक मोठे नेते भाजपमध्ये सहभागी होणार आहेत.” असा दावाही भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला.
हा प्रवेश सोहळा रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यामुळे भाजपच्या शक्तीप्रदर्शनाचे हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपकडे वळत असल्याने नाशिकच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.
सुनील केदार म्हणाले की, रविवारी रावसाहेब थोरात सभागृहात सुनील बागुल, मामा राजवाडे आणि गुलाब भोये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याशिवाय, राहुल दिवे यांचाही प्रवेश होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, अजून काही शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. लवकरच त्यांच्या प्रवेशाची घोषणा होईल.” रविवारी होणाऱ्या या जंबो पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व अधिक भक्कम करण्याच्या हालचाली वेग घेताना दिसत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून भाजपने ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आपली ताकद वाढवली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पक्षबळ वाढवण्यासाठी सातत्याने मोठमोठे पक्षप्रवेश सुरू आहेत. आगामी काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काँग्रेससह इतर पक्षांचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे.
यावरही सुनील केदार यांनी भाष्य केलं आहे. “फक्त काँग्रेसचेच नव्हे तर इतर सर्वच पक्षांचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी बोलणी सुरू आहेत. रविवारी (२८ जुलै) होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर येत्या आठ ते पंधरा दिवसांत आणखी मोठमोठे नेते भाजपमध्ये येणार आहेत.” यंदा पक्षप्रवेश सोहळे नाशिकमध्येच का घेतले जात आहेत, यावर स्पष्टीकरण देताना सुनील केदार यांनी सांगितले की, “प्रवेश स्थानिक पातळीवरच व्हावा, अशी आमचीही आणि प्रवेश घेणाऱ्या इच्छुकांचीही इच्छा होती. त्यामुळेच हे प्रवेश नाशिकमध्येच आयोजित करण्यात आले आहेत. आगामी काळात देखील भाजपमध्ये होणारे अनेक महत्त्वाचे पक्षप्रवेश नाशिकमध्येच होतील. अनेक नेते लवकरच भाजपमध्ये सहभागी होणार आहेत.” या पार्श्वभूमीवर भाजपची इनकमिंग मोहीम अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षात होत असलेल्या या मोठ्या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.