
Kiran Bedi, CJP, Crowd Control, Delhi Police, CJP Student Protest,
कायद्याची अंमलबजावणी आणि गर्दी नियंत्रणाच्या पद्धतींवर भाष्य करताना किरण बेदी म्हणाल्या की, “मूलभूत समस्या ही आहे की विद्यार्थ्यांची आंदोलने थेट सशस्त्र दलांशी का भिडतात? ही आपल्या व्यवस्थेतील एक गंभीर त्रुटी असून ती पूर्णपणे ब्रिटिशकालीन व्यवस्था आहे. प्रत्येक कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी किंवा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यासाठी थेट सशस्त्र दलांना पुढे आणणे अत्यंत चुकीचे आहे. या पद्धतीचा गैरवापर होत असून आपण या ब्रिटिश व्यवस्थेपासून आता लवकरात लवकर फारकत घेतली पाहिजे.”
IPS अधिकारी किरण बेदी यांनी पोलिसांच्या गर्दी नियंत्रणाच्या पद्धतीबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. बेकायदेशीर जमाव झाल्यास पोलिसांनी टप्प्याटप्प्याने कारवाई करावी, महिला पोलिसांची दुसरी सुरक्षा फळी तैनात करावी आणि आंदोलनासाठी जंतर-मंतरऐवजी रामलीला मैदानाचा विचार करावा, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
किरण बेदी म्हणाल्या, “बेकायदेशीर जमाव झाल्यानंतर सर्वप्रथम नागरी संरक्षण (Civil Defence) पथकाचा सामना आंदोलकांशी व्हायला हवा. त्यांच्या हातात लाठ्या नसतात, त्यामुळे लाठीमाराचा प्रश्नच येत नाही. जर आंदोलकांनी बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला, तर त्यानंतर दुसऱ्या सुरक्षा फळीत महिला पोलिसांना तैनात करावे. अशावेळी आंदोलक महिला पोलिसांवर हल्ला करतील का? संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद होत असतो. महिला पोलिसांकडे लाठ्या नसल्या तरी हेल्मेट आणि बॉडी आर्मर असल्यामुळे त्या दगडफेकीपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात.”
त्या पुढे म्हणाल्या, “आंदोलकांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतरच सशस्त्र पोलिसांचा वापर हा अंतिम पर्याय असावा. परिस्थितीनुसार वॉटर कॅनन, लाठीमार किंवा अश्रुधूराचा वापर करायचा की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यावा. कोणत्याही प्रकारचे बळाचा वापर शेवटच्या टप्प्यातच व्हायला हवा.”
त्यांनी असेही सांगितले की, संपूर्ण आंदोलनावर कॅमेरे आणि ड्रोनद्वारे लक्ष ठेवले पाहिजे. त्यामुळे आग लावणारे, दगडफेक करणारे किंवा हिंसाचार करणारे नेमके कोण आहेत, हे स्पष्टपणे ओळखता येईल.
किरण बेदी यांनी आंदोलन व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित केले. “आंदोलकांना थेट संसद भवनाच्या दिशेने जाण्याचा मार्ग दाखवला जात आहे. मध्ये कोणताही सुरक्षित बफर झोन किंवा अतिरिक्त अडथळा नाही. ही व्यवस्था योग्य वाटत नाही,” असे त्यांनी सांगितले.
जंतर-मंतरऐवजी आंदोलन रामलीला मैदानावर आयोजित करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यांच्या मते, जंतर-मंतर हे लहान क्षेत्र असून ते बाजारपेठेजवळ आहे. त्यामुळे आंदोलनामुळे परिसरातील व्यापारावर मोठा परिणाम होतो. दुकाने बंद ठेवावी लागतात आणि काही ठिकाणी लूटमारीच्या घटनाही घडल्याचा दावा त्यांनी केला. मोठ्या आंदोलनांसाठी रामलीला मैदान अधिक योग्य ठिकाण ठरू शकते, कारण त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांवरील परिणामही कमी होईल, असंही किरण बेदी यांनी म्हटलं आहे.