नवी मुंबई /सिद्धेश प्रधान : नुकतेच वाशी येथे झालेल्या एका कार्यक्रमात गणेश नाईक यांनी युती होवो अथवा ना होवो नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार असा दावा केला आहे. नाईकांच्या या दाव्यावर शिंदे गटाकडून अद्याप कोणतेही प्रत्युत्तर दिले गेले नसले. तरी भाजपाच्या आमदार व गणेश नाईकांच्या मुख्य प्रतिस्पर्धी मंदा म्हात्रे यांनी मात्र आता या वादात उडी घेतल्याने राजकारणातील रंगत वाढली आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आ. मंदा म्हात्रे म्हणल्या की, नवी मुंबईत युती करायची की नाही ते आमचे वरिष्ठ ठरवतील. तसेच नवी मुंबईतील महापौर हे आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. तो एखादा सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता देखील असू शकतो असे आ. म्हात्रे म्हणल्या. म्हात्रे यांच्या वक्तव्याचा रोख वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे असल्याचे यानिमित्ताने दिसून येत असून, आता नाईक विरुद्ध शिंदे गट व मंदा म्हात्रे असे चित्र नवी मुंबईत दिसू लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील राजकारण शिगेला पोहोचले आहे. नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक सातत्याने प्रमुख राजकीय शत्रू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सातत्याने आरोप करत आहेत. तर शिंदे आरोपांकडे दुर्लक्ष करून राज्याच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र शिंदेंचे समर्थक मात्र नाईकांना जशास तसे उत्तर देत आहेत. यात आता सत्तेचे रणांगण अद्याप दूर असले,तरी नाईक यांनी थेट महापौर पदाच्या उल्लेखाने या राजकीय शह काटशहात नव्या विषयाला फोडणी दिली आहे.
मुख्य म्हणजे महापौर पदावर दावा करताना नाईकांनी युती झाली तरी महापौर मीच ठरवणार हे वक्तव्य केले आहे. शिंदे गटाकडून यावर अपेक्षित उत्तर येणार असले तरी, आमदार मंदा म्हात्रे यांनी मात्र नाईकां वक्तव्यावर व्यक्त होत एकप्रकारे,त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा हा तत्वावर चालणारा पक्ष असून, घराणेशाही नाकारणारा पक्ष आहे. हे नवी मुंबईत भाजपाने दाखवून दिले आहे. त्यामुळे नवी मुंबईत भाजपची सत्ता आम्ही आणूच, युती झाली तरी आम्ही एकत्र लढू, मात्र नवी मुंबईतील महापौर जे वरिष्ठ नेते ठरवतील जर तो भाजपाचा होणार असल्यास त्याचा निर्णय आमचे देवा भाऊ घेतील अन्य कोणी नाही. उलट भाजपा धक्कातंत्र देण्यास माहीर असल्याचे देशातील व राज्याच्या राजकारणात जनतेने पाहिले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील महापौर सर्व सामान्य कार्यकर्ता देखील होऊ शकतो असे आ. मंदा म्हात्रे म्हणल्या. आ. म्हात्रे यांच्या वक्तव्याने नवी मुंबईतील राजकारणात मला दुर्लक्षित करून चालणार नाही असा संदेश त्यांनी दिल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
गावांचा विकास व्हावा, ती शहराला जोडली गेली पाहिजेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार मी दिवाळे गाव दत्तक घेतले.त्याचा सर्वांगीण विकास होत आहे. त्यानुसार नवी मुंबई पालिकेत समाविष्ट झालेल्या १४ गावांचा समावेश होणे आवश्यक आहे. एक भाऊ गरीब असेल दुसरा श्रीमंत असेल तर त्यास जगण्याचा अधिकार नसावा का? या १४ गावांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यास निधी मिळणे गरजेचे आहे. ही गावे याआधी पालिकेत होती.व्यायामुळे या गावांचा समावेश व त्याचा विकास झाल्यास आम्हाला काहीही हरकत नाही असे आ. मंदा म्हात्रे म्हणाल्या.