डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी; 'या' बड्या नेत्याने दिला राजीनामा

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने पक्षात नाराजी उफाळली आहे. या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी पदाचा राजीनामा दिला.
Sharad pawar ncp support Delimitation Bill 2026.jpg
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच पक्षातील नेत्यांचा राजीनामा (फोटो - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • राष्ट्रवादी शरद पवार गटाने डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा दिल्याने नाराजी

  • डिलिमिटेशनमुळे एका नेत्याने दिला राजीनामा

  • पक्षाची भूमिका अनेकदा संदिग्ध असल्याचा केला आरोप

NCP Support Delimitation Bill : माढा : राष्ट्रवादी शरद पवार गटाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्याने राजकारण तापले आहे. केंद्रासह राज्यात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इंडिया आघाडीमध्ये महत्त्वपूर्ण पक्ष असूनही डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी पक्षावर नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे अगदी पक्षांतर्गत नाराजी असल्याचे समोर आले आहे. डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी राजीनामा दिला आहे.

अभयसिंह जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. यामध्ये पक्षाने भूमिका बदलून डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने नाराजी व्यक्त करत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. अभयसिंह जगताप यांनी लिहिले, "गेली अनेक वर्षे पक्षाचे निष्ठेने काम केले. पक्षाचे विभाजन झाले तेव्हा सुद्धा शरदचंद्र पवार साहेबांशी निष्ठा राखून पक्षाशी प्रामाणिक राहिलो, माढा लोकसभा मतदार संघात घराघरात पक्षाचे नविन चिन्ह पोहचवले. साहेबांच्या शब्दाखातर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली, सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत आपल्याकडे आवश्यक मतदान नसताना सुद्धा, पक्ष आदेशानुसार निवडणूक ताकतीने लढविली. विरोधकांनी अनेक प्रलोभने दाखविली असताना सुद्धा माघार घेतली नाही. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला सत्ताधाऱ्यांशी लढताना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात, आर्थिक नुकसान होते. इतके सगळे होऊन सुद्धा कधी विचारांशी आणि निष्ठेशी तडजोड केली नाही."डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवारांचे इंडिया आघाडीतील स्थान काय? राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले...

पुढे त्यांनी लिहिले, "सध्याची परिस्थिती पाहता पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी अनेक बाबतीत विचारांशी तडजोड केल्याचे जाणवते. मतदार संघ पुनर्रचना विधेयक म्हणजे फक्त खासदारांची संख्या वाढवणे आणि महिलांना ३३% आरक्षण देणे एवढेच नव्हे तर मतदारसंघांच्या परिसीमा नव्याने निश्चित करणे हे सुद्धा आहे. ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करताना सुद्धा भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष देऊन आपलीच ग्रामपंचायत कशी येईल अश्या पद्धतीची वॉर्ड रचना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देतात. आता तर लोकसभा मतदार संघाची सीमा ठरवायची आहे, या सीमा ठरविताना अशा पद्धतीने ठरविल्या जातील कि त्याचा सरळ फायदा भाजपला होईल. या माध्यमातून विरोधक देशातून पूर्णपणे हद्दपार करण्याचा सत्ताधारी विचार करत असताना आपला पक्ष त्यास पाठिंबा देतो आहे हे पाहून मनाला वेदना होतात,"

डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवारांचे इंडिया आघाडीतील स्थान काय? राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले...

पुढे त्यांनी लिहिले, "हा विषय फक्त मतदार संघ पुनर्रचना पुरता मर्यादित नाही. अनेक बाबतीत पक्षाची भूमिका संदिग्ध वाटते. त्यामुळे आम्ही सामान्य कार्यकर्ते अत्यंत हवालदिल झालो आहोत. ज्या पक्षाशी इतकी वर्षे प्रामाणिक राहिलो त्या पक्षाला सर्वसामान्य कार्यकर्त्याची किंमत नाही असे वाटायला लागले आहे. आम्ही मतदार संघात बलाढ्य विरोधकांशी लढतो आहोत आणि त्यामुळे आम्हाला जो त्रास होतो आहे, त्याची जराशी सुद्धा जाणीव न ठेवता, आपला पक्ष सरळ सरळ सत्ताधाऱ्यांशी हात मिळवणी करत असेल तर पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी लढायचे कशासाठी? आपली घरे जाळून, निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्याला मागे ठेऊन, आपण आम्हाला त्रास देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असाल, तर आम्ही थांबलेले बरे." असे पत्र लिहित अभयसिंह जगताप यांनी पक्षातून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.

NDA Convocation Ceremony : "आधुनिक युद्धात तंत्रज्ञान महत्त्वाचे ..", डॉ. बीएचव्हीएस नारायण मूर्ती यांचे प्रतिपादन

Q

अभयसिंह जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाचा राजीनामा का दिला?

A

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिल्याने नाराज होऊन अभयसिंह जगताप यांनी राजीनामा दिला.

Q

अभयसिंह जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्या पदावर होते?

A

अभयसिंह जगताप हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.

Q

अभयसिंह जगताप यांनी राजीनाम्याच्या पत्रात काय म्हटले आहे?

A

पक्षाने विचारांशी तडजोड केल्याची नाराजी त्यांनी पत्रातून व्यक्त केली. मतदारसंघ पुनर्रचनेचा भाजपला फायदा होऊ शकतो आणि विरोधकांना देशातून हद्दपार करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांना पक्षाने पाठिंबा दिल्याने वेदना होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.