

आमदार निलेश राणे यांनी माध्यमांशी साधला संवाद
संदीप देशपांडे यांच्या पैशांच्या बॅगेच्या व्हिडीओवर दिली प्रतिक्रिया
फॉरेन्सिक तपासणी करण्याची केली मागणी
सिंधुदुर्ग : शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. संदीप देशपांडे यांनी समोर आणलेल्या पैशांच्या बॅगेच्या व्हिडीओवर बोलताना, या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी केली. तसेच व्हिडिओ खरा आहे की बनावट, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.
निलेश राणे म्हणाले, “संदीप देशपांडे यांनी जो व्हिडिओ समोर आणला आहे, त्याची फॉरेन्सिक तपासणी झाली पाहिजे. तो व्हिडिओ खरा आहे की बनावट, हे समजलं पाहिजे. त्याचबरोबर दादरमधील मनसेच्या राजगड कार्यालयात झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओचीही तपासणी करा. त्या घटनेत नेमकं काय घडलं, हेही समोर आलं पाहिजे,” असं निलेश राणे म्हणाले.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा नेमकी कुठून सुरू झाली, याची मला माहिती नाही. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही अधिकृत चर्चा ऐकलेली नाही. आम्ही युतीचे घटक पक्ष आहोत. अशी काही चर्चा सुरू असेल, तर आम्हाला नक्कीच समजेल. कोणताही आधार नसलेल्या बातमीला उत्तर देण्याची गरज काय?”
परिसीमन विधेयकावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर बोलताना निलेश राणे यांनी काँग्रेसच्या कार्यकाळाची आठवण करून दिली. “परिसीमन ही काही नवीन प्रक्रिया नाही. काँग्रेसच्या कार्यकाळातही परिसीमन झालं होतं. २००९ मध्ये झालेल्या परिसीमनानंतरच मी खासदार झालो. मग आज परिसीमनाला देशद्रोह म्हणत असाल, तर काँग्रेसलाही देशद्रोही ठरवा. विधेयकाबाबत काही आक्षेप असतील, तर ते सभागृहात मांडावेत.”
सौरव दास यांच्याविरोधात काढण्यात आलेल्या लुकआऊट नोटीसचंही त्यांनी समर्थन केलं. “देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आरोप असतील, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. लंडन दौऱ्यासाठी निधी कुठून येतो आणि त्यांना व्याख्यानासाठी कोणी बोलावलं, हे समजलं पाहिजे. त्यांच्या परदेश दौऱ्याचा उद्देश आणि संपर्कांची चौकशी होण्यात काहीच गैर नाही. त्यामुळे लुकआऊट नोटीस काढण्यात काहीही चुकीचं नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोव्यातही निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती निलेश राणे यांनी दिली. “शिवसेना आता राज्याबाहेरही विस्तार करत आहे. उत्तर प्रदेशसोबत गोव्यातही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता महाराष्ट्राबाहेरही वाढत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची मागणी असेल, तर पक्षाने त्यांना संधी दिली पाहिजे,” असं ते म्हणाले.
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून होत असलेल्या विरोधावरही त्यांनी भाष्य केलं. “महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा झाली पाहिजे. जिल्हाधिकारी, मंत्री आणि प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत. शेतकऱ्यांशी वारंवार चर्चा करून मार्ग काढण्यात काहीच हरकत नाही. कोणावरही अन्याय होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे,” असं निलेश राणे यांनी स्पष्ट केलं.