'खासदारकीपेक्षा जनसेवा मोठी, जिल्हा बँकेत पदासाठी नव्हे तर...'; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं? (File Photo : UDAYANRAJE-BHOSALE)
उदयनराजे भोसले मित्रमंडळाच्या वतीने हॉटेल लेक व्ह्यू येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, संग्राम बर्गे, डी. के. पवार, रामभाऊ लाहोटी, संतोष कणसे, बाळासाहेब ननावरे, अशोक मोने, यशवंत ढाणे, उदयसिंह जगदाळे, धनाजी साळुंखे आदी उपस्थित होते.
उदयनराजेंनी घराण्याची परंपरा, सहकार चळवळीचा मूळ उद्देश आणि सर्वसामान्यांच्या विकासाबाबत आपली भूमिका मांडली. उदयनराजे पुढे म्हणाले, जिल्हा बँक असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र, आमच्या घराण्याच्या परंपरेला कधीही तडा जाऊ देणार नाही. कोणत्याही अडचणीच्या काळात कमी पडणार नाही. पदे येतात आणि जातात; त्याचा मी विचार करत नाही. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हीच माझी पुण्याई आहे,’ असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
सहकाराचा केंद्रबिंदू सामान्य माणूसच
सहकारी बँका, पतसंस्था, सूतगिरण्या आणि साखर कारखाने ही सहकार चळवळीची प्रमुख साधने आहेत. त्यांचा लाभ शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्या पुढील पिढ्यांच्या प्रगतीसाठीही सहकाराचा उपयोग झाला पाहिजे, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणावर
महाराष्ट्रात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणावर रुजली. सातारा जिल्हा बँकेचे नेतृत्व अनेक दिग्गजांनी केले. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवल्यामुळेच सहकार तळागाळापर्यंत पोहोचला. मात्र, सहकारात राजकारण शिरल्यास सर्वसामान्यांच्या उन्नतीचा मूळ हेतू बाजूला पडतो आणि चळवळीची वाताहत होते, असा इशाराही त्यांनी दिला.
…एवढाच जिल्हा बँकेत येण्यामागचा हेतू
‘माझ्यापेक्षा सहकाराचे अधिक ज्ञान असलेले अनेक जण आहेत. मात्र, जिल्हा बँकेत मी असावे, असा त्यांचा आग्रह होता. जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याची संधी मिळते, एवढाच जिल्हा बँकेत येण्यामागचा हेतू आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.






