

रामदास आठवलेंचा मोठा दावा
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलनीकरणाच्या चर्चा?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची आणि शरद पवारांच्या एनडीए प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी एक मोठा दावा केला आहे. शरद पवार यांनी 2019 मध्ये एनडीएसोबत येण्याचा निर्णय घेतला असता, तर 2022 मध्ये ते देशाचे राष्ट्रपती झाले असते, असं आठवले यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. (Ramdas Athawale on Sharad Pawar)
माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या राजकीय भूमिकेवर भाष्य केलं. त्यांच्या मते, शरद पवार हे अनुभवी नेते असून त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी एनडीएसोबत येण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, असं आठवले म्हणाले.
विशेष म्हणजे, 2019 मध्ये पवारांनी एनडीएमध्ये प्रवेश केला असता, तर 2022 मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाची संधी मिळाली असती, असा दावाही त्यांनी केला. मात्र, पवारांनी त्यावेळी तसा निर्णय घेतला नाही. आजही त्यांची भूमिका एनडीएमध्ये सहभागी होण्याची नसल्याचं आठवले यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत बोलताना आठवले यांनी अजित पवारांचा उल्लेख केला. अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निर्णय होऊ शकला असता, असं त्यांना वाटतं. मात्र, त्यांच्या निधनानंतर आता दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही, हे सांगणं कठीण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
शरद पवारांनी एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाचा मार्गही मोकळा होऊ शकतो, असं आठवले म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्याच्या भूमिकेचं आठवले यांनी स्वागत केलं. पक्षाचे आठ खासदार या विधेयकांच्या समर्थनात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
एकीकडे शरद पवारांच्या एनडीए प्रवेशाची चर्चा, तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य एकत्रीकरणावर राजकीय नेत्यांची विधानं समोर येत आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या राजकारणात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.