Sanjay Pawar resigns as Shiv Sena Thackeray group deputy leader Kolhapur political news
कोल्हापूर : राज्यामध्ये एकीकडे मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढलेला असताना दुसरीकडे कोल्हापूरमध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्यांनी थेट राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाचे कोल्हापूरचे नेते व उपनेते संजय पवार यांनी राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी रवीकिरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या नियुक्तीवरुन संजय पवार हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यानंतर आता त्यांनी थेट पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकारण रंगलं आहे.
कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य सुरु असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. संजय पवार यांनी त्यांच्या उपनेतेपदासह सभासद पदाचा देखील राजीनामा दिला आहे. अंतर्गत कलह आणि नियुक्तीवरुन नाराजी असे संजय पवार यांच्या राजीनाम्यामागे कारण असल्याच्या चर्चा आहेत. या राजीनाम्यानंतर संजय पवार यांना अश्रू अनावर झाले असल्याचे दिसून आले आहे. कार्यकर्त्यांसमोर संजय पवार यांना राजीनाम्यानंतर रडू कोसळले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संजय पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मी 1990 पासून मी शिवसैनिक म्हणून काम करत आहे. गेल्या 36 वर्षांपासून एकनिष्ठेने मी शिवसैनिक म्हणून काम केले आहे. मात्र गेल्या दहा वर्षापासून शिवसेनेमध्ये काहीतरी वेगळं घडत आहे. जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करताना विश्वासर्हता आणि पारदर्शकता तपासयला हवी,” असे मत संजय पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन संजय पवार यांची नाराजी स्पष्टपणे उघड झाली आहे.
पुढे संजय पवार म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीत षड्यंत्र रचण्यात आले. मधुरिमाराजे यांनी अचानक माघार का घेतली? राजू लाटकर यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांच्यासाठी देखील शिवसेना राबली होती. मात्र विधानसभेला मधुरिमाराजे यांनी माघार का घेतली होती? हे भविष्यात समोर येईल. कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र ही नियुक्ती करताना उपनेत्याला माहिती नसेल तर काय करायचे,” असा सवाल देखील संजय पवार यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री उदय सामंत यांनी संजय पवार यांना शिवसेना शिंदे गटामध्ये येण्याची ऑफर देखील दिली आहे. ते म्हणाले की, “संजय पवार हे सच्चे शिवसैनिक आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे संघटन कौशल्य असून अशा व्यक्तीवर अन्याय करणे आणि अप्रत्यक्षपणे त्यांना तुम्ही निघून जा असे सांगणे बरोबर नाही. अजून आमची संजय पवार यांच्याशी चर्चा झालेली नाही. पण, संजय पवार यांच्यासारखी एखादी चांगली व्यक्ती आम्हाला मिळत असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतीला ते येत असतील तर नक्कीच आम्ही त्यांचे स्वागत करू. प्रत्येक वेळी जातात त्यांना जाऊ दे, बाकीच्यांचा अपमान करायचा, त्यांची बदनामी करायची. त्या लोकांना नावं ठेवायची, हाच उद्योग त्यांचा सुरू असतो. म्हणूनच ठाकरे गटातील सर्व मंडळी आज एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेत आहे,” असे स्पष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.