

शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चां
चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट
Supriya Sule on Sharad Pawar Retirement: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शरद पवार यांच्या निवृत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अशातच त्यांच्या राजकीय निवृत्तीबाबत एका वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी या सगळ्या चर्चांवर थेट उत्तर दिलं आहे.
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या बातम्यांवर सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शरद पवार निवृत्त होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. कोणी निवृत्त व्हायचं हे जनता ठरवेल, असं म्हणत त्यांनी या चर्चांवर प्रश्न उपस्थित केला.
विशेष म्हणजे, शरद पवार यांचा राज्यसभेचा अजून पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. मग ते निवृत्त कसे होतील, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा प्रकारच्या निवृत्तीच्या बातम्या चालवल्या जात असतील, तर ते संतापजनक असल्याचंही त्या म्हणाल्या.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. शरद पवार रुग्णालयात असताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली.
याशिवाय सुनील तटकरे यांनी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा केल्याचं म्हटलं होतं. मात्र, यावर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर आमच्या बाजूने हा विषय संपला आहे. आता आमच्या पक्षातील नेतेही या विषयावर भाष्य करत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शरद पवारांचा पक्ष भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या ताज्या विधानांमुळे राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत पुन्हा एकदा उत्सुकता वाढली आहे. आता शरद पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते यावर पुढे काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.