Swarajyrakshak Sambhaji serial actress Ashwini Mahangde joins Sharad Pawar group
वाई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. पक्षांतर वाढली असून इच्छुकांच्या महत्त्वकांशा वाढल्या आहेत. दरम्यान, शरद पवार गटामध्ये सर्वांत जास्त इनकमिंग वाढले आहे. अनेक नेते मंडळी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत असून शरद पवार यांच्या बैठका देखील वाढल्या आहेत. यामध्ये आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीने प्रवेश केला आहे.
हे देखील वाचा : पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्षांनीच दिला राजीनामा
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये अश्विनी महांगडे हिने शरद पवार गटाचे नेते व खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत काम केले होते. राणू आक्का यांची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी साकारली होती. अमोल कोल्हे आणि अश्विनी महांगडे यांच्यामधील बहीण भावाचे प्रेमाचे आणि अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात होते. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख म्हणून अमोल कोल्हे शिवस्वराज्य यात्रा करत होते. त्यानंतर आता अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे.
प्रवेश करताच जबाबदारी
‘आई कुठे काय करते’ या मालिकांमध्ये अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने उत्कृष्ट अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर आता अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. पक्षामध्ये प्रवेश करताच त्यांना जबाबदारी देखील देण्यात आली आहे. अश्विनीला महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे. साताऱ्यातील वाई या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या पक्षप्रवेशाची आणि पदाची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली. याच मेळाव्यात अश्विनीचा पक्षप्रवेश झाला. मेळाव्याला जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबूब शेख, बाळासाहेब पाटील हे देखील उपस्थित होते.