फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, सप्टेंबरचा महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक महत्त्वाचे उपवास आणि सण साजरे होणार असून चंद्रग्रहणासारखी घटना ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते. या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. याला ब्लड मून असे म्हटले जाते. या काळात चंद्र लाल दिसतो म्हणून त्याला ब्लड मून असे म्हटले जाते.
हिंदू पंचांगानुसार, चंद्रग्रहण रविवार, 7 सप्टेंबर रोजी रात्री 10.59 वाजता सुरू होईल आणि सोमवार, 8 सप्टेंबर रोजी पहाटे 3.23 वाजता संपेल. एकूण हे ग्रहण सुमारे 3 तास 24 मिनिटे चालेल.
ज्योतिषशास्त्रामध्ये सुतक काळाला खूप महत्त्व आहे. चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक काळ सुरू होतो. या दृष्टिकोनातून पाहिल्या गेल्यास यावेळी सुतक काळाची सुरुवात दुपारी 12.59 वाजल्यापासून होईल आणि रात्री ग्रहण संपेपर्यंत राहील. या काळात धार्मिक कार्य, पूजा आणि शुभ कार्य करण्याचे टाळावे.
यावेळी चंद्रग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार आहे. त्याचा सुतक काळ देखील भारतात वैध असेल. यामुळे मंदिरांचे दरवाजे नियोजित वेळेपूर्वी बंद केले जातील आणि धार्मिक कार्यक्रम देखील सुतक कालावधी संपल्यानंतरच होतील.
भारताव्यतिरिक्त हे चंद्रग्रहण जगातील अनेक भागात दिसणार आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील काही भाग, फिजी बेटे आणि अंटार्क्टिकाच्या काही भागात हे चंद्रग्रहण दिसून येईल.
चंद्रग्रहणाची सुरुवात भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होत आहे. पितृपक्ष देखील या दिवसापासून सुरू होतो. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, सुतक काळ सुरू होण्यापूर्वी पौर्णिमा श्राद्ध आणि पितृ कर्म करावेत.
असे म्हटले जाते की, ज्यावेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्यावेळी सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यावेळी चंद्र लाल किंवा काळा दिसतो. या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात.
धार्मिक मान्यतेनुसार, सुतक काळ आणि चंद्रग्रहण दरम्यान मंदिरांचे दरवाजे बंद असतात. या काळात पूजा, हवन यांसारखे कोणतेही धार्मिक विधी केले जात नाही. या काळात गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नका, तीक्ष्ण हत्यारे वापरू नका आणि अन्न शिजवू नका असा सल्ला देण्यात आला आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)