फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये भाद्रपद महिन्याला विशेष महत्त्व आहे. यावेळी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. राधा राणीचा अवतार दिवस शुक्ल पक्षात साजरा केला जातो. तसेच भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवही साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात अनेक मोठे व्रत आणि सण साजरे केले जातात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी किंवा जलझुलणी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. परिवर्तिनी एकादशी कधी आहे, जाणून घ्या
पंचांगानुसार, परिवर्तिनी एकादशी तिथीची सुरुवात बुधवार, 3 सप्टेंबर रोजी पहाटे 3.53 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी पहाटे 4.21 वाजता होईल. उद्यतिथीनुसार परिवर्तिनी एकादशीचे व्रत बुधवार, 3 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे.
परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंची पूजा करावी. शक्यतो एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून आवरुन घ्यावे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करुन पूजा करुन घ्यावी. विष्णूची मूर्ती किंवा चित्र एका चौरंगावर किंवा पाठावर स्थापित करावे. त्यानंतर नैवेद्य म्हणून पिवळी फुले, तुळशीची पाने, तांदळाचे दाणे, रोली, चंदन आणि मिठाई किंवा फळे इत्यादी गोष्टी अर्पण कराव्यात. तसेच परिवर्तिनी व्रताची व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी. त्यानंतर विष्णूची आरती आणि मंत्रांचा जप करा. ॐ नमो भगवते वासुदेवाय जप करणे खूप शुभ मानले जाते. त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार गरजूंना काही वस्तूंचे दान करा. या दिवशी अन्न, कपडे किंवा पैसे दान करणे पुण्याचे काम मानले जाते.
जी व्यक्ती परिवर्तिनी एकादशीचे व्रत करते त्या व्यक्तीला अनेक फायदे होतात. शास्त्रांमध्ये या व्रताला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. असे मानले जाते की, या व्रताच्या दिवशी व्यक्तीने उपवास केल्यास जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे केलेले सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो. हे व्रत केल्याने व्यक्तीच्या घरामध्ये सुख-समृद्धी येते आणि जीवनात सौभाग्य वाढते. त्यामुळे हे व्रत खूप फायदेशीर मानले जाते. जे भक्त हे व्रत भक्ती आणि श्रद्धेने पाळतात, त्यांना हजार अश्वमेध यज्ञांसारखेच पुण्यपूर्ण फळ मिळते. या दिवशी भगवान विष्णूंसोबत वामन अवताराचीही पूजा केली जाते. मान्यतेनुसार, वामनाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे आणि कष्ट दूर होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)