फोटो सौजन्य- pinterest
यंदा गणेश चतुर्थीचा उत्सव बुधवार, 27 ऑगस्टपासून सुरु होत आहे. हा उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. हा उत्सव खूप खास मानला जातो. हा उत्सव 10 दिवस साजरा केला जातो. असे मानले जाते की, या काळात चुकूनही एखाद्या व्यक्तीने चंद्र पाहिला तर त्या व्यक्तीला कलंकाचा आणि अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. मात्र या दिवशी चंद्र पाहणे का निषिद्ध मानले जाते. काय आहे यामागील धार्मिक कारण.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1.54 वाजता सुरु होणार आहे आणि त्याची समाप्ती बुधवार, 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3.44 वाजता होईल. यामुळे या दोन्ही दिवशी चंद्र पाहणे टाळावे. मात्र या दिवशी चुकूनही चंद्र पाहिल्यास कोणते उपाय करावे, जाणून घ्या
गणेश चतुर्थीला चंद्र पाहणे निषिद्ध मानले जाते. यामागे एक कथा प्रसिद्ध आहे. एका दिवशी गणपती बाप्पा रात्री उंदरासोबत खेळत होते त्यावेळी अचानक मुषकराजांना एक साप दिसला आणि त्यांनी घाबरून उडी मारली ज्यामुळे त्यांच्या पाठीवर स्वार झालेले गणेशजी जमिनीवर पडले. त्यावेळी चंद्र देवाने संपूर्ण घटना पाहिली आणि ते मोठ्याने हसायला लागले. या गोष्टीचा गणपती बाप्पाला राग आला आणि त्यांनी त्यांना शाप दिला की, तू कायमचा काळा होशील, तुझा प्रकाश निघून जाईल. यानंतर त्यांनी परत घेण्याची विनंती गणपती बाप्पाकडे केली. यावेळी चंद्रदेव घाबरला त्याने आपल्या चुकीचा पश्चात्ताप केला आणि गणपतीची माफी मागितली. बाप्पानी चंद्रदेवला माफ केले पण सांगितले की मी माझा शाप परत घेऊ शकत नाही.
त्यानंतर त्यांनी असे सांगितले की, महिन्यातून एकदा असे होईल जेव्हा तुमचा सर्व प्रकाश निघून जाईल आणि नंतर हळूहळू दररोज तुमचा आकार वाढेल आणि महिन्यातून एकदा तुम्ही तुमच्या पूर्ण स्वरूपात दिसाल. त्यावेळेपासून कृष्ण पक्षात चंद्राचा प्रकाश कमी होऊ लागतो आणि अमावस्येनंतर शुक्ल पक्षात त्याचे तेज पुन्हा वाढू लागते. पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो.
गणपती बाप्पा असे देखील म्हणाले की, माझ्या वरदानामुळे तू नक्कीच प्रकट होशील, पण शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीच्या दिवशी जर कोणी तुला पाहिले तर त्याच्यावर खोटे बोलण्याचा आरोप लावला जाईल. त्याची प्रतिमा खराब होईल. चंद्राला दिलेली ही शिक्षा सर्वांच्या नेहमीच लक्षात राहते.
गणेश चतुर्थीला चंद्र पाहिल्यास सिंह: प्रसेन मानवाधित सिंहो जाम्बवता हताह सुकुमार मा रोदिस्तव ह्येश: स्यामंतक:’ या मंत्राचा जप करावा. या मंत्रांचा जप केल्याने कलंक आणि येणाऱ्या समस्येला तोंड द्यावे लागत नाही, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)