फोटो सौजन्य- istock
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. पवित्र असा हा श्रावण महिन्यात विविध सण-उत्सवाची रेलचेल असते. श्रावणातील सणांना विशिष्ट धार्मिक महत्व आहे. श्रावण अमावस्येला साजरा करण्यात येणाऱ्या पोळा सणालाही आगळे वेगळे आणि खास महत्व आहे. देशभरात विविध नावांनी पोळा हा सण साजरा केला जातो. आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला ‘मोठा पोळा’ आणि दुसर्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवतात याला ‘तान्हा पोळा’ असे म्हटले जाते.
हेदेखील वाचा- तुमच्या घरातील समृद्धी वाढवण्यासाठी या वास्तू टिप्स वापरुन बघा
अमावस्या प्रारंभ आणि समस्या
हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो. त्यानुसार यंदा श्रावणी अमावस्या 2 सप्टेंबर रोजी असणार आहे. 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजून 21 मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल. तर 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 24 मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल. यावेळी 2 सप्टेंबर रोजी बैलपोळा साजरा केला जाईल.
हेदेखील वाचा- घरात स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे, जाणून घ्या वास्तू नियम
बैलपोळा सणाचे महत्त्व
श्रावण अमावास्येच्या दिवशी शेतकरीवर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा करतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा भिन्न असतात. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी बैलांना गोडधोड नैवेद्य खाऊ घालून सण साजरा करण्याची परंपरा आहे. पोळा हा सण मोठा पोळा आणि छोटा पोळा अशा दोन प्रकारे साजरा केला जातो. मोठ्या पोळ्यामध्ये बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते, तर लहान पोळ्यामध्ये मुलं खेळण्यातील बैल शेजारच्या घरोघरी घेऊन जातात आणि नंतर त्यांना काही पैसे किंवा भेटवस्तू दिली जातात.
बैलपोळा सण कसा साजरा केला जातो
पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात. प्रत्येक शेतकरी आपल्याला झेपेल असा बैलांचा साजश्रुंगार करतात. बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.