फोटो सौजन्य- pinterest
आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील स्कंद षष्ठी शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी आहे. स्कंद षष्ठीचा दिवस भगवान कार्तिकेयला समर्पित आहे. या दिवशी उपवास केल्याने आणि भगवान कार्तिकेयांची विशेष पद्धतीने पूजा केल्याने इच्छित फळे प्राप्त होतात. त्यासोबत जीवनात आलेल्या सर्व चिंता दूर होतात आणि ग्रहदोष देखील दूर होतात. या काळात कार्तिकेयाची पूजा केल्याने पितृदोष, नागदोष आणि ग्रहदोष दूर होतात. त्यासोबतच निवारण आणि आरोग्य सुधारण्यासाठी देखील ही पूजा करणे फायदेशीर ठरते.
पंचांगानुसार, 12 सप्टेंबर रोजी पंचमी तिथी आहे. या दिवशी षष्ठी तिथीची सुरुवात सकाळी 9.58 वाजता होणार आहे. या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11.52 वाजल्यापासून सुरू होऊन दुपारी 12.42 पर्यंत असेल. या काळात राहू काळचा मुहूर्त सकाळी 10.44 वाजता सुरु होईल आणि 12.17 वाजता संपेल. यावेळी सूर्य देव सिंह राशीमध्ये असेल तर चंद्र संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सिंह राशीमध्ये असेल. त्यानंतर तो वृषभ राशीमध्ये आपले संक्रमण करेल. स्कंद षष्ठीच्या दिवशी रवी योग आणि हर्षण योग तयार होणार आहेत त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीन वाढलेले राहील.
या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व आवरुन झाल्यानंतर एका स्टुलावर किंवा चौरंगावर लाल रंगांचे वस्त्र पसरवून घ्या आणि त्यावर भगवान कार्तिकेयची मूर्तीची स्थापना करा. त्यानंतर नऊ ग्रह आणि गणपती बाप्पाची पूजा करुन घ्या. त्यानंतर, भगवान कार्तिकेयला कपडे, सुगंधी द्रव्ये, चंपा फुले, दागिने, दिवे, धूप आणि नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर आरती करुन ओम स्कंद शिवाय नमः मंत्रांचा जप करा.
स्कंद षष्ठीचे व्रत हे भगवान कार्तिकेयाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. या दिवशी उपवास करून कार्तिकेय मंत्राचा जप करणे, सुब्रमण्य स्तोत्र वाचणे आणि मंदिरात दिवे आणि धूप अर्पण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि मुलांना धैर्य, विजय आणि आनंद मिळतो. त्याचप्रमाणे या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि स्कंद षष्ठी व्रत मंगळ दोष, जमीन-मालमत्ता वाद आणि शारीरिक आजारांपासून सुटका होण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते.
स्कंद पुराणानुसार, स्कंद षष्ठी शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी तारकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, त्यानंतर ही तारीख स्कंद षष्ठी म्हणून साजरी केली जाऊ लागली. यावेळी संततीच्या आनंदापासून वंचित असलेल्या जोडप्यांनी स्कंद षष्ठीचा व्रत पाळले पाहिजे. असे म्हटले जाते की, या दिवशी कार्तिकेयाची पूजा केल्याने संततीमध्ये आनंद, शत्रूंवर विजय त्यासोबतच भीती दूर होते आणि धैर्य मिळते, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)