फोटो सौजन्य- istock
आज 26 ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे आणि जन्माष्टमीचा दिवस सुद्धा साजरा केला जाणार आहे. भगवान शंकरासह श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाईल. शिवपूजनासोबतच हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिक खास मानला जात आहे. चौथ्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करायची? मंत्र कोणता म्हणायचा ते जाणून घेऊया.
श्रावण महिन्यामध्ये शंकराची उपासना, आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. श्रीविष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कार्यभार महादेवांकडे असतो, अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून महादेवाना आवाहन करुन त्यांची करुणा भाकण्यासाठी रुद्राभिषेक, पूजा अर्चना केली जाते. चौथ्या सोमवारी शिवामूठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे. सोमवार हा शंकराचा वार असल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त आहे.
शुभ संयोग
26 ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी शश योग, सर्वार्थ सिद्धी योग, गजकेसरी योगासह धनयोग आणि त्रिग्रही योगांचा शुभ संयोग जुळून आला आहे. या काळात तुम्हाला मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
हेदेखील वाचा- जन्माष्टमीपासून नवीन आठवड्याची सुरुवात, कसा असेल या राशींचा आठवडा
शिवपिंडीचे पूजन कसे कराल
श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी व्रताचा संकल्प करावा. तसेच शिवलिंगावर दूधाचा अभिषेक करावा. यानंतर भगवान शंकरासह श्रीकृष्णाचे ध्यान करावे. ऊँ सोमेश्वराय नम: या मंत्राचे पठण करावे. चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून जव वाहिले जाते.
शिवमूठ वाहताना काय करावे
श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवमूठ वाहताना नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने । शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।। या मंत्राचे पठण करावे. तसेच घरातील शिवलिंगाची विधीवत पूजा करावी. या दिवशी श्रीकृष्णाचे स्मरण करावे. सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुले, पिवळे वस्त्र, पिवळी फळं आणि पिवळे मिष्ठान्न अर्पण करून श्रीकृष्णाची पूजा करावी. विवाह झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यावर शिवामूठ वाहावी.
हेदेखील वाचा- भानू सप्तमीच्या दिवशी कशी पूजा करावी, जाणून घ्या
शिवशंकराला काय अर्पण करावे
शिवभक्त या दिवशी महादेवांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग नसल्यास प्रतिमेची पूजा करावी किंवा पाटावर शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे एक पान वाहिले, तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते.
सोमवारी व्रताचरण कसे करावे
श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर व्रताचा संकल्प करावा. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. त्यानंतर महादेवाचे ध्यान करावे. ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारान शंकराची, तर ओम नमः शिवायै या मंत्रोच्चाराने पार्वती देवीची पूजा करावी.