९ ऑगस्ट, स्वातंत्र्यलढ्याचा टर्निंग पॉइंट! 'भारत छोडो' चळवळ आणि संपूर्ण देश ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकवटला (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
August Kranti Divas Marathi News: भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या, पण ९ ऑगस्ट १९४२ चा दिवस हा त्या सर्वांमध्ये एक विशेष स्थान राखून आहे. हा दिवस “ऑगस्ट क्रांती दिवस” म्हणून ओळखला जातो. या दिवशी महात्मा गांधींनी “भारत छोडो” चळवळीची हाक दिली आणि संपूर्ण देशात ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकजूट निर्माण झाली.
दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रज सरकारने भारताची संमती न घेता भारताला युद्धात सामील केले. यामुळे भारतीयांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. अनेक वेळा इंग्रजांना विनंती करूनही त्यांनी स्वातंत्र्याची हमी दिली नाही. अखेर ८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर एक ठराव मंजूर केला आणि गांधीजींनी “करेंगे या मरेंगे” (Do or Die) हे ब्रीद देत आंदोलन सुरू केले.
भारतातील ब्रिटीश सरकारविरुद्धच्या चळवळी लक्षात घेता, ब्रिटीश सरकारने स्टॅफोर्ड क्रिप्स यांना नवीन संविधान आणि स्वराज्याबाबत भारतीय लोकांच्या कोंडीचे निराकरण करण्यासाठी एका मोहिमेवर पाठवले. हे अभियान अयशस्वी झाले. याचे कारण म्हणजे ब्रिटीश सरकार भारताला पूर्ण स्वातंत्र्य देत नव्हते तर फाळणीसह भारताला डोमिनियन दर्जा देत होते.
डोमिनियन दर्जा म्हणजे ब्रिटिश सरकारचे वर्चस्व स्वीकारणे आणि स्वतःचे सरकार स्थापन करणे. याशिवाय, भारतीय स्वातंत्र्यसैनिक दुसऱ्या महायुद्धात भारतीय नागरिकांना पाठवण्याच्या विरोधात होते.
७ ऑगस्ट १९४२ रोजी संध्याकाळी मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीत निर्णय घेण्यात आला की दुसऱ्या दिवशी ब्रिटिशांपासून सत्ता मिळवण्याच्या मोहिमेत मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर (आता ऑगस्ट क्रांती मैदान) एक मोठी जाहीर सभा आयोजित केली जाईल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी महात्मा गांधींनी याच मैदानात एक प्रसिद्ध भाषण दिले.
या चळवळीच्या नावाबद्दल बरीच चर्चा झाली. महात्मा गांधींना चळवळीचे नाव असे हवे होते की ते लोकांच्या मनात कोरले जाईल. यासाठी अनेक नावे सुचवण्यात आली. शेवटी ‘भारत छोडो’ ही घोषणा युसूफ मेहेरअली यांनी दिली. युसूफने ‘सायमन गो बॅक’ ही घोषणा देखील दिली होती.
संपूर्ण स्वराज्य या भावनेने प्रेरित होऊन इंग्रजांना भारतातून हुसकावून लावायचं असं ठरल्यानंतर महात्मा गांधीनी करेंगे या मरेंगे आणि चले जाव या दोन क्रांतीकारी घोषणा दिल्या. पुढे याच घोषणेनं सारा भारत ढवळून निघाला आणि देशभरात इंग्रजांविरोधात असंतोष वाढत गेला. देशभरात इंग्रजांविरोधात आंदोलनं होऊ लागली. मात्र ही आंदोलनं शांततापूर्ण मार्गाने असावी असं गांधीजींचं म्हणणं होतं. अशात काही आंदोलनांना हिसक वळणं लागली.
हे असं काही घडणार आहे याची कुणकुण इंग्रजांना लागली आणि ०९ ऑगस्ट १९४२ चं आंदोलन होऊ नये किंवा त्याची सुरूवात होऊ नये यासाठी इंग्रजांनी महात्मा गांधींसह जवळपास सर्वच बड्या नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. गांधीजींना पुण्याच्या आगाखान पॅलेस इथं ठेवण्यात आलं होतं आणि इतर बड्या नेत्यांना नगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आलं होतं.
बडे नेतेच नसल्याने नऊ ऑगस्टचा प्लान फसणार अशा भ्रमात इंग्रज होते. मात्र त्याच वेळेस मुंबईच्या गवालिया टँक इथं तरूण तडफदार नेत्या अरूणा असफअली यांनी तिरंगा फडकावत भारत छोडोचा नारा दिला आणि त्याचं लोण मग देशभर पसरलं. इंग्रजांच्या भ्रमाचा भोपळा ०९ ऑगस्ट १९४२ साली फुटला आणि हे आंदोलन इंग्रजांना आवरता आलं नाही.
ब्रिटीशांनी भारत छोडो आंदोलनाला प्रतिसाद म्हणून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांच्यासह जवळजवळ संपूर्ण काँग्रेस नेतृत्वाला कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात टाकले आणि त्यापैकी बहुतेक १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपेपर्यंत तुरुंगात होते. याव्यतिरिक्त, काँग्रेसला बेकायदेशीर संघटना घोषित करण्यात आली आणि देशभरातील तिच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आणि त्यांचा निधी जप्त करण्यात आला.
मुख्य नेत्यांच्या अटकेनंतर, भारत छोडो चळवळ हिंसक झाली आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली, ज्यामध्ये छापे टाकणे आणि सरकारी इमारती जाळणे यांचा समावेश होता. कमकुवत समन्वय आणि स्पष्ट कृती योजनेच्या अभावामुळे, १९४३ पर्यंत ही चळवळ बंद पडली.
मात्र या देशव्यापी भारत छोडो आंदोलनामुळे ब्रिटिश सत्तेला मोठा धक्का बसला. भारतीय जनतेने ब्रिटिशांना हे स्पष्ट करून दिलं की, आता त्यांचं भारतात स्वागत नाही. या आंदोलनानंतर काहीच वर्षांत १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
“भारत छोडो आंदोलन” ही केवळ एक राजकीय चळवळ नव्हती, ती होती भारतीय जनतेच्या स्वाभिमानाची लढाई. ऑगस्ट क्रांती दिवस हे स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लाखो ज्ञात-अज्ञात वीरांचे स्मरण करून देणारा दिवस आहे. त्यामुळे हा दिवस आपण अभिमानाने आणि कृतज्ञतेने साजरा केला पाहिजे.
Dadar Kabutarkhana closed : कबुतर पाळणे हे राजेशाही थाट! मात्र दाणा पाणी टाकण्याची अडवली आहे वाट