
Computer Literacy Day Special! A new approach to modern technology empowerment; Special interaction with Dr. Deepak Shikarpur
सोनाजी गाढवे/पुणे : आजच्या आधुनिक युगात डिजिटल उपकरणे आपली दैनंदिन गरज बनली आहेत. कधीकाळी केवळ चैनीची वस्तू समजली जाणारी मोबाईल व संगणक यंत्रणा आता घरोघरी पोहोचली असून आधुनिक तंत्रज्ञान सबलीकरणाचा नवीन दृष्टिकोन होत आहे असे स्पष्ट मत संगणक साक्षरता प्रसारक डॉ. दिपक शिकापूरकर यांनी मांडले. संगणक साक्षरता दिवसानिमित्त नवराष्ट्रने त्यांच्याशी विशेष संवाद साधला.
हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईला ‘लॉर्ड्स’ पावला! शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीसमोर आसामची फलंदाजी उद्ध्वस्त
शिक्षण, कृषी, आरोग्य, बँकिंग किंवा उद्योग संगणकाशिवाय काम करणे अशक्य असल्याचे सांगत दिपक शिकारपूरकर म्हणाले, विशेषतः कोविडनंतर डिजिटल वापराचा वेग प्रचंड वाढला. आज लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण विविध डिजिटल साधनांचा वापर करीत आहेत. भारत हा आज जगातील आघाडीचा सॉफ्टवेअर निर्यातदार देश असून, संगणक उद्योगात सुमारे ८० लाखांहून अधिक लोक कार्यरत आहेत.
ऑनलाइन माहितीचा सुरक्षित वापर करणारा नागरिकच खरा साक्षर
स्वातंत्र्योत्तर काळात वाचता–लिहिता येणारी व्यक्ती साक्षर मानली जात होती; मात्र आज डिजिटल साधने योग्यरीत्या हाताळणारा, ऑनलाइन माहितीचा सुरक्षित वापर करणारा नागरिकच खरा साक्षर मानला जातो असे नमूद करत शिकारपूरकर यांनी सांगितले, भारतात संगणकाचा प्रवास सुमारे सत्तर वर्षांपूर्वी सुरू झाला. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) येथे पहिल्यांदा संगणक दाखल झाला; त्याकाळी त्याचा वापर फक्त शास्त्रज्ञांसाठी मर्यादित होता. १९६० च्या दशकात राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) स्थापन करून सरकारने संगणकीकरणाला गती दिली.
अटल बिहारी वाजपेयी यांची घोषणा डिजिटल प्रगतीसाठी ठरली महत्त्वपूर्ण
डॉ. दिपक शिकापूरकर म्हणाले, सन ८० च्या दशकात आयटी क्षेत्राला अजून स्थैर्य मिळाले नव्हते. संगणक व्यावसायिकांबाबत समाजात संभ्रम होता; आयटी म्हणजे इन्कम टॅक्स, एवढीच ओळख अनेकांना होती. मुलींना संगणक शिकवायला पालक कचरायचे डोळ्यांवर परिणाम होईल, अशी भीती होती. मात्र ९० च्या दशकात परिस्थिती झपाट्याने बदलली. मध्यमवर्गीय तरुण-तरुणींनी आयटी शिक्षणातून आर्थिक प्रगती साधली, परदेशी संधी मिळवल्या. आयटी इज इंडियाज टुमॉरो ही घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९९ च्या विज्ञान काँग्रेसमध्ये दिली आणि भारताने डिजिटल स्वप्नाकडे झेप घेतली.
हेही वाचा : IND vs SA: विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयामुळे BCCI अडचणीत! रोहित शर्माकडून मात्र आला होकार
सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन फसवणूक व डिजिटल नीतिमत्तेचे प्रश्न गंभीर होत आहेत. मोबाईल वापरातील ‘स्वयंप्रशिक्षण’ अपुरे ठरते. त्यामुळे प्राथमिक स्तरापासूनच सुरक्षित वापराचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. आज संगणक साक्षरता दिनी केवळ तंत्रज्ञान शिकण्यापेक्षा प्रशिक्षित व सुरक्षित डिजिटल नागरिक बनणे हीच २०२६ मधील खरी काळाची गरज आहे.
-डॉ दीपक शिकारपूर लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक