Syed Mushtaq Ali Trophy 2025 : मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. आसामविरुद्धच्या सामन्यात शार्दुलने आग ओकणारी गोलंदाजी केली. त्याच्या तीन षटकांच्या छोट्या स्पेलमध्ये विरोधी फलंदाजीचा क्रम उध्वस्त झाला. त्याने पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीमुळे मुंबईला सामन्यात एकतर्फी विजय मिळवण्यात यश आले.
हेही वाचा : Ashes series 2025: इंग्लंडकडून अंतिम प्लेइंग इलेव्हनची घोषणा! 3 वर्षांनंतर ‘या’ खेळाडूला लागली लॉटरी
प्रथम फलंदाजी करताना, सर्फराज खानच्या शानदार शतकामुळे मुंबईने २२० धावांचा डोंगर उभा केला. २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आसाम सुरुवातीपासूनच खचलेला दिसून आला. संपूर्ण संघाला फक्त १२२ धावाच करता आल्या आणि मुंबईने ९८ धावांनी सामना आपल्या नावे केला. फलंदाजांसोबतच आसामचे गोलंदाज देखील निष्प्रभ ठरला आहे.
शार्दुल ठाकूरने आसामच्या डावाची सुरुवातच उध्वस्त करून टाकली. त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर दानिश दासला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर अवघ्या चार धावांवर अब्दुल कुरेशीला देखील माघारी पाठवले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर आसामचा कर्णधार रियान परागला देखील शार्दुलच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. अशाप्रकारे, शार्दुल ठाकूरने पहिले षटकात आसामची धार बोथट केली.
दुसऱ्या षटक टाकण्यास आलेल्या शार्दुलने सुमितला फक्त एका धावेवर माघारी पाठवले. आसामचे फलंदाज त्याच्यासमोर पूर्णपणे असहाय्य दिसून आले. विरोधी संघाचे पाच खेळाडू दुहेरी आकडा देखील गाठू शकले नाहीत. शार्दुल ठाकूरने ३ षटकात अवघ्या २३ धावा देत ५ बळी घेतल्याने सामन्याचे वळणच बदलले.
आसामविरुद्धच्या सामन्यात आयुष म्हात्रे आणि अजिंक्य रहाणे यांच्यातील सलामीच्या भागीदारीनंतर, सरफराज खानने फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी करत शतक ठोकले. त्याने ४७ चेंडूत नाबाद १०० धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत सरफराजने ८ चौकार आणि ७ लांब षटकार ठोकले.
हेही वाचा : IND vs SA: विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयामुळे BCCI अडचणीत! रोहित शर्माकडून मात्र आला होकार
दुसऱ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणे आणि तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यासोबत केलेल्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे मुंबईने आपला पाया मजबूत केला. सरफराजच्या स्फोटक खेळीमुळे, संघ २० षटकांत मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला. परिणामी ठाकूरच्या घटक गोलंदाजीसमोर आसाम संघ टिकू शकला नाही आणि त्यांना ९८ धावांनी पराभव पत्करावा लागला.
शार्दुल ठाकूर आता आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. एमआयने त्याला लखनौ सुपर जायंट्सकडून खरेदी केले असून गेल्या हंगामात तो एलएसजीकडून खेळला होता. त्याने एलएसजीकडून शार्दुलने १० सामन्यांमध्ये १३ बळी टिपले होते. त्याच्या पुनरागमनामुळे मुंबईच्या गोलंदाजी आक्रमणाला अधिक बळकटी मिळाली असल्याचे बोलले जात आहे.






