International Women’s Day 2025: नवजात बालकांना आईचे दूध मिळवून देण्यासाठी 'मिशन दूधदान' सुरू करणाऱ्या, निराधारांची आई 'गुंजनताई' (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
International Women’s Day Marathi News: एचआयव्हीबाधित महिलांच्या बाळांसह अनेक बेवारस नवजात अर्भकांना दुधाची गरज भासते. अनेकदा मातेची प्रकृती चांगली नसल्याने ती बाळाला दूध देऊ शकत नाही. तसेच काही स्तनदा मातांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या बालकांना दूध कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी नवजात बालकांना आईच्या दुधाशिवाय पर्याय नसतो. अशा बालकांचा विचार डोळ्यासमोर ठेवून अमरावतीमध्ये एक चळवळ उभी राहिली, ‘मिशन दूधदान!”
नोव्हेंबर 2022 ची घटना, कडाक्याची थंडी, एका रात्री अमरावतीच्या पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात घडली वाईट घटना घडली. एका विवाहिता आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. तिचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने बाळ वाचलं, मात्र त्या बाळाची मांडीची हड्डी 3 जागी तुटली. आईच्या मृत्यूनंतर भुकेने व्याकुळ झालेलं ते बाळ तब्बल 10 ते 11 तास सतत रडत, कुडकुडत कृषि महाविद्यालयाच्या त्या जंगली भागात, रात्रभर मेलेल्या आईच दूध प्यायचा प्रयत्न करू लागले पण त्याला कुठे माहिती की आपली आई या जगातच नाही आहे. सकाळी जेव्हा पोलिसांना ह्या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्या बाळाला बघून पोलिसांना पहिल नाव आठवल ते म्हणजे गुंजन गोळे.
गुंजन गोळे घटनास्थळी पोहचल्या आणि बघतात काय तर मेलेल्या आईची अंगावरील कुर्ती छातीच्या एका भागातून पूर्ण फाटून गेली आहे. म्हणजे रात्रभर त्या लेकरानी दुधासाठी किती धडपड केली असेल याची तिव्रता त्यांना कळली. त्यांनी लगेच त्या बाळाला शेकडो लोकांच्या गर्दीत आपल्या उराशी कवटाळल आणि त्या बाळाला स्वतःच दूध पाजलं तेव्हा कुठे ते बाळ शांत झाल आणि झोपी गेल. दिवसभर कुशीत घेऊन त्यांनी त्याला कित्येकदा दूध पाजलं आणि मातृत्वाची एक वेगळी ओळख करून दिली.
आजही समाजात अशी अनेक बालके आहेत ज्यांना आईच दूध मिळत नाही. अकाली मृत्यू झालेल्या, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या, एचआयव्ही बाधित महिला आपल्या नवजात बाळाला स्तनपान करू शकत नाही. अशावेळी पर्याय असतो तो ह्युमन मिल्क बँक चा, मात्र मिल्क बँक मध्ये पुरेसा साठा उपलब्ध नसतो, कारण या बद्दल अजूनही महिलांमध्ये जागृती नाही किंवा कमी प्रमाणात आहे. स्तनदा मातांना योग्य मार्गदर्शन नसल्याने किंवा काही इतर कारणानें आजही आपले जास्तीचे दुध मिल्क बँक ला न देता फेकून दिल्या जाते.
गुंजन गोळे यांच्या लक्षात जेव्हा ही बाब आली तेव्हा या प्रश्नावर उपाय म्हणून त्या घरी जाऊन आईचे दूध कलेक्ट करून ते मिल्क बँक ला आणून देण्याच धाडसी पाऊल त्यांनी उचलल. अमरावतीमध्ये त्यांनी काम सुरू केल. विशेष म्हणजे हे कार्य त्या एकट्या करतात, या कार्यासाठी त्या कुणाकडून अनुदान घेत नाहीत उलट हे कार्य आपल इति कर्तव्य मानून निस्वार्थपणे त्यांच मिशन दूधदान सुरू आहे.
आजच्या या धकाधकिच्या आयुष्यात जिथे आपल्याला शेजारच्या घरी कोण राहत हे माहित नसते तेथे गुंजन गोळे गेल्या एका दशकापासून सातत्याने धडपड करीत आहेत. अनेक अनाथ, एड्सबाधित, निराधार, बेवारस, मनोरुग्णांसाठी कार्य करत आहेत.
अमरावतीच्या राजकमल चौकात त्यांना एक मनोरुग्ण महिला अर्धानग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला दिसली. त्या महिलेच्या अंगावर जेमतेम कपडे होते. केस सुटलेले, अनेक दिवस अंघोळ न केल्याने ती विचित्र दिसत होती. त्यातच ती गरोदर आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ते दृश्य बघून त्यांना खूप रडू आलं, किळस वाटली, स्वत:ला माणूस म्हणवून घेण्याची लाज वाटायला लागली. त्यांनी धीर एकवटला, त्या महिलेला घेऊन तिची योग्य ती सोय लावण्याचा आणि महिलांसाठी कार्य करण्याचा ठाम विचार केला. आणि तेव्हापासून सुरू झालेल या सेवाव्रतींच सेवायज्ञ सतत धगधगतय.
अमरावती मध्ये आजवर शेकडो बेवारस मृतदेहांचा अंतिम विधी सुद्धा त्या स्वतःच्या पैश्यातून करतात. यासाठी त्यांचे पती अश्विन तळेगांवकर यांचीही त्यांना मदत असते हे विशेष. आजवर कित्येक नवजात बालकांना त्यांनी मृत्यूच्या जबड्यातून वाचवले आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या आणि रस्त्यावर फेकून दिलेल्या अनेक नवजात शिशुंना जीवदान दिले आहे.
अमरावती मध्ये मार्डी रोड राजुरा गावाजवळ गुंजनताईने अनाथ, निराधार , बेवारस व एड्सबाधित मुलांसाठी “गोकुळ” हा निवासी प्रकल्प सुरू केला आहे. त्याला कुठलीही शासकीय अनुदान किंवा मदत नाही. स्वतःची पूर्ण जमापुंजी, बँकेचे लोन काढून व लोकसहभागातून त्या हा प्रकल्प चालवतात. आज शेकडो अनाथ, निराधार, बेवारस मुलांच पालकत्व त्यांनी स्वीकारलय. संस्थेतर्फे वैद्यकीय मदत, दूधदान चळवळ, कुमारीमाता व एकलमातांचे प्रश्न व त्यांचे समुपदेशन, बेवारस मृतदेहांचे अंतिमविधी, बचगटाच्या महिलांनी रोजगार उपलब्ध करून देणे, असे अनेक उपक्रम राबवले जातात. आजवर अनेक लोकांचे आयुष्य त्यांनी खऱ्या अर्थाने उज्वल केले आहे. गोकुळ चालविताना अनेक संकटांना रोज त्यांना सामोरे जावे लागत आहे पण ताईच्या चेहऱ्यावर सतत हसूच असते हे विशेष.