
फोटो सौजन्य: iStock
ते सालं 2012 होतं जेव्हा चीनचे जहाज जपानला चालले होते. परंतु ते जहाज तो प्रवास पूर्ण करू शकला नाही आणि मधेच कुठेतरी ते गायब झाले. या जहाजाचे नाव एमवी एल जी असे होते, ज्यात 19 क्रू मेंबर होते. यानंतर चिनी तपास यंत्रणा ते जहाज शोधायची मोहीम हाती घेतात. परंतु त्यांच्या हाती काहीच लागत नाही. या घटनेला 7 वर्ष झाली परंतु त्या तपास यंत्रणेच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर अनेक तज्ञांनी या जागेस दुसरे बर्म्युडा ट्रँगल असे नाव दिले. वास्तविक, आम्ही जपानमधील ‘डेव्हील सी’ बद्दल बोलत आहोत.
बर्म्युडा ट्रँगल सारख्या रहस्यमयी सागरी क्षेत्राविषयी संपूर्ण जगाला माहिती आहे, पण मध्य जपानचा सागरी भागही अतिशय धोकादायक मानला जातो. अहवालांवर विश्वास ठेवला तर, डझनभर जहाजे येथे बेपत्ता झाली आहेत आणि त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत आजही सरकारकडे कोणतेही उत्तर नाही.
डेव्हिल्स सी, ज्याला ड्रॅगन ट्रायंगल म्हणूनही ओळखले जाते. हे जपानजवळील पॅसिफिक महासागरातील एक रहस्यमय सागरी क्षेत्र आहे, जे रहस्यमय घटना आणि जहाज गायब होण्यामुळे प्रसिद्ध आहे. यामुळेच या क्षेत्राला ‘जपानी बर्मुडा ट्रायंगल’ असे देखील संबोधतात. जपानच्या मियाके बेटापासून ते इवो जिमा दरम्यान पसरलेल्या या भागाने शेकडो संशोधकांचे लक्ष वेधले आहे.
चंद्र आतून पोकळ कि भरीव? काय आहे ‘Hollow Moon Theory’? जाणून घ्या
13व्या शतकात कुबलाई खानच्या फ्लीटचे अवशेष या भागात सापडले होते, जे एका ऐतिहासिक दुर्घटनेचे प्रतीक मानले जाते. 1940-50 च्या दशकात 20 हून अधिक मासेमारी करणारे आणि पाच लष्करी जहाजे अचानक गायब झाल्याच्या घटना याठिकाणी घडल्या होत्या. या घटनांमुळे संशोधकांमध्ये या भागाचा धोका अधिक अधोरेखित झाला.
1952 मध्ये जपानने या भागाचा अभ्यास करण्यासाठी कायो मारु नंबर 5 नावाचे एक संशोधन जहाज पाठवले. दुर्दैवाने, ते जहाजही गायब झाले आणि त्यावरील 31 क्रू मेंबर सुद्धा एका रात्रीत गायब झाले. या घटनेनंतर जपानी सरकारने हा भाग अतिधोकादायक क्षेत्र म्हणून घोषित केले.