लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली अन् झाडांच्या प्रेमात पडली! रत्नागिरीच्या माधुरी कळंबटेंनी उभारला 'वृक्षवल्ली'चा डोलारा
माधुरी कळंबटे या मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरातील आहेत. त्यांचे बालपण अलोरे धरणाच्या परिसरात गेले. कोकणातील हिरवीगार झाडे, लाल माती, मुबलक पाणी आणि शेतीच्या वातावरणात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे वडील पाटबंधारे विभागात कार्यरत होते. कुटुंबातील इतर सदस्यही शेतीशी जोडलेले होते. जवळपास ३० सदस्यांच्या एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे कोकणातील संस्कृती आणि निसर्गाविषयीचे प्रेम त्यांच्या मनात लहानपणापासून रुजले. घरातील शेतीची कामे, विविध पिके आणि झाडांचे संगोपन पाहताना भविष्यात निसर्गाशी संबंधित काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
Navratri 2026: नवरात्रीत अखंड ज्योतीजवळ झोपणे शुभ की अशुभ? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या
बारावीनंतर माधुरी यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांच्या आजीचीही तशी इच्छा होती. मात्र, कौटुंबिक आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणासाठी लागणारा खर्च लक्षात घेऊन त्यांनी वेगळा पर्याय निवडला. आईची इच्छा होती की त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे. दुसरीकडे माधुरी यांना शेतीशी संबंधित क्षेत्रात काम करायचे होते. त्यामुळे त्यांनी कृषी अभियांत्रिकीची निवड केली. दापोली येथील कृषी विद्यापीठाला भेट दिल्यानंतर शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्रीची आणि विविध अभ्यासक्रमांची त्यांना माहिती मिळाली.
ट्रॅक्टर चालवणे, कृषी यंत्रे हाताळणे आणि शेतीतील तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार असल्याने त्यांनी कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतला.
त्या काळात या अभ्यासक्रमात मुलींची संख्या तुलनेने कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.
कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना माधुरी यांना विविध प्रकारच्या झाडांची ओळख झाली.दापोलीच्या सुंदर परिसरात फिरताना वेगवेगळ्या वनस्पती, त्यांचा सुगंध आणि वैशिष्ट्ये याविषयी त्यांचे कुतूहल वाढत गेले. विशेषतः सुरंगीच्या झाडाचा सुगंध आणि त्याचे सौंदर्य पाहून त्या प्रभावित झाल्या होत्या. कृषी क्षेत्रात केवळ शेतीच नव्हे, तर फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, अन्नप्रक्रिया अशा अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत शिक्षण आणि नोकरी करताना माधुरी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीला मुंबईतील लोकल रेल्वेचा प्रवास, पूर्व-पश्चिम दिशांची माहिती आणि शहरातील वेगवान जीवनशैली या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन होत्या. मात्र, त्यांनी प्रत्येक अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न केला. पॅकेजिंग उद्योगातील लहान-मोठ्या उत्पादन केंद्रांना भेटी देऊन विविध प्रक्रिया समजून घेतल्या.
प्लास्टिकच्या बाटल्या, बॉक्स आणि इतर पॅकेजिंग साहित्य कसे तयार केले जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला. नोकरीची सुरुवात प्रशिक्षणार्थी म्हणून केली आणि पुढे व्यवस्थापकपदापर्यंत प्रगती केली.
मुंबईतील नोकरीमुळे आर्थिक स्थैर्य मिळाले होते. मात्र, माधुरी यांना आपल्या गावाची आणि कुटुंबाची सतत आठवण येत होती. शिक्षणासाठी लहानपणापासून घराबाहेर राहिल्यामुळे आता गावात स्थायिक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे पती प्रतीक यांनीही त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. सासू-सासऱ्यांनीदेखील शिक्षणाचे कर्ज आणि नोकरीची परिस्थिती समजून घेत सहकार्य केले. लग्नानंतरही माधुरी यांनी सुमारे दीड वर्ष नोकरी सुरू ठेवली. आठवड्याच्या शेवटी त्या रत्नागिरीला जात असत. अखेर २०१५ च्या अखेरीस त्यांनी मुंबईतील नोकरी सोडून रत्नागिरीला परतण्याचा निर्णय घेतला.
रत्नागिरीत परतण्यापूर्वीच माधुरी यांनी स्थानिक प्रदर्शनांमध्ये झाडांचे स्टॉल लावण्यास सुरुवात केली होती. त्या काळात प्रदर्शनांमध्ये कपडे, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंचे स्टॉल असायचे. मात्र, झाडांचा स्वतंत्र स्टॉल तुलनेने दुर्मीळ होता. माधुरी यांनी या संधीचा उपयोग केला.
सुरुवातीला ग्राहकांशी संवाद साधून त्यांना कोणत्या प्रकारची झाडे आवडतात, घरात किती जागा असते आणि झाडांच्या संगोपनाबाबत कोणत्या अडचणी येतात, याची माहिती त्यांनी गोळा केली. या अनुभवातून रत्नागिरी शहरात दर्जेदार रोपे आणि त्याबाबत योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची गरज त्यांच्या लक्षात आली.
माधुरी यांच्या मते, कोणताही व्यवसाय एका दिवसात यशस्वी होत नाही. ग्राहकांचा विश्वास मिळवणे, त्यांच्या गरजा समजून घेणे आणि चांगल्या दर्जाची उत्पादने उपलब्ध करून देणे यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी लागते. त्यांनी ग्राहकांना केवळ झाडे विकण्याऐवजी ती जगवण्यासाठी योग्य माहिती देण्यावर भर दिला. झाडे कशी लावायची, किती पाणी द्यायचे आणि त्यांची निगा कशी राखायची, याबाबत प्रामाणिक मार्गदर्शन करणे हा त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग बनला. सुरुवातीला व्यवसाय उभा करण्यासाठी बराच वेळ लागला. त्यानंतर कोरोनाच्या काळातील अडचणींचाही सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
स्थिर नोकरीपेक्षा स्वतःच्या आवडीला प्राधान्य देऊन व्यवसाय उभारण्याचा त्यांचा प्रवास महिलांसाठी आणि नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
Navratri 2026: नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची केली जाते पूजा, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे






