समुद्राच्या पोटात दडलंय अनोखं विश्व! समुद्री गाय आणि द्वारकेचा संबंध काय? प्राचीने उलगडली खोल समुद्रातील अद्भुत रहस्ये
डुगाँग हा समुद्रात राहणारा सस्तन प्राणी आहे. त्याला ‘सी काऊ’ अर्थात समुद्री गाय असेही म्हटले जाते. हा प्राणी प्रामुख्याने समुद्रातील गवतावर जगतो. प्राची यांनी सांगितले की, डॉल्फिनप्रमाणे डुगाँग समुद्राच्या पृष्ठभागावर उड्या मारत नाही. श्वास घेण्यासाठी तो काही वेळाने पाण्याच्या पृष्ठभागावर येतो आणि पुन्हा समुद्रात निघून जातो. बोटींचा आवाज ऐकल्यानंतरही तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. डुगाँगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या शरीराची रचना. त्याच्या शेपटीच्या आकारामुळे पूर्वीच्या काळात खलाशांना तो जलपरीसारखा दिसायचा. त्यामुळे जलपरीच्या कथांचा संबंध डुगाँगशी जोडला जात असल्याचे प्राची यांनी सांगितले.
गुजरातच्या समुद्रात संशोधन करत असताना घडलेला एक अविस्मरणीय प्रसंग प्राची यांनी शेअर केला. गुजरातमधील समुद्री बेटांवर आणि प्रवाळ खडकांच्या परिसरात त्यांची संशोधन टीम काम करत होती. ओहोटीच्या वेळी काही बेटांभोवतीचे पाणी ओसरल्यानंतर समुद्री गवताचे क्षेत्र दिसू लागले. त्या वेळी संशोधकांना समुद्री गवत आणि मातीचे नमुने गोळा करण्यासाठी मर्यादित वेळ मिळायचा. अशाच एका दिवशी प्राची नमुने गोळा करण्याचे काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्याने ड्रोनच्या मदतीने समुद्राचे निरीक्षण सुरू केले होते. अचानक त्याने प्राची यांना बोलावले आणि ड्रोनच्या स्क्रीनवर दिसणारा एक सागरी प्राणी दाखवला.तो प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून डुगाँग होता! प्राची यांच्या म्हणण्यानुसार, गुजरातमधील त्यांच्या संशोधनादरम्यान मिळालेला हा डुगाँगचा पहिला छायाचित्रात्मक पुरावा होता. विशेष म्हणजे, ज्या प्राण्याच्या संवर्धनासाठी त्या तीन ते चार वर्षे काम करत होत्या, तो प्राणी त्यांनी तोपर्यंत प्रत्यक्ष पाहिलाच नव्हता.
या अनुभवाबद्दल बोलताना प्राची यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक स्थानिक लोकांनी त्यांना डुगाँग आता या भागात दिसत नसल्याचे सांगितले होते. काहींनी तर अनेक वर्षांपूर्वी डुगाँग पाहिल्याच्या आठवणी सांगत संशोधनावर वेळ वाया घालवू नका, असा सल्लाही दिला होता. मात्र, ड्रोनच्या माध्यमातून डुगाँगचा पुरावा मिळाल्यानंतर त्यांच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली. हा क्षण आपल्या संशोधनातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्रातील प्रदूषण आणि इतर धोक्यांनंतरही हा दुर्मीळ प्राणी त्या परिसरात अस्तित्वात असल्याचे पाहून त्यांना मोठा आनंद झाला.
डुगाँगच्या संवर्धनासाठी त्याच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे प्राची यांनी स्पष्ट केले. डुगाँग हा प्रामुख्याने समुद्री गवतावर अवलंबून असतो. त्यामुळे समुद्री गवताचे क्षेत्र नष्ट झाल्यास त्याच्या अन्नसाखळीवर परिणाम होऊ शकतो. समुद्रातील प्रदूषण, मानवी हस्तक्षेप आणि अधिवासातील बदल यांसारख्या धोक्यांचा अभ्यास संशोधकांकडून केला जातो. डुगाँगला एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवून त्याचे संवर्धन करणे सोपे नाही. त्यामुळे तो ज्या नैसर्गिक परिसरात राहतो, त्या परिसराचे संरक्षण करणे हा अधिक महत्त्वाचा मार्ग असल्याचे प्राची यांनी सांगितले.
भारतात गुजरात, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबार बेटांच्या समुद्री परिसरात डुगाँग आढळतो. प्राची यांनी सांगितले की, पूर्वी डुगाँगच्या संख्येबाबत उपलब्ध असलेली माहिती अनेकदा स्थानिक लोकांच्या मुलाखती आणि निरीक्षणांवर आधारित होती. त्यामुळे त्यांची अचूक संख्या निश्चित करणे संशोधकांसाठी मोठे आव्हान होते. तामिळनाडूतील एका अभ्यासात २७० डुगाँगची नोंद झाल्याचा उल्लेख केला. मात्र, भारतातील सर्व डुगाँगची एकत्रित आणि अद्ययावत संख्या निश्चित करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.डुगाँग हा अंदमान निकोबारचा राज्य प्राणी आहे.
डुगाँगच्या जीवनशैलीतील आणखी एक रंजक बाब म्हणजे त्यांची संवाद साधण्याची पद्धत. प्राची यांच्या माहितीनुसार, डुगाँग विविध प्रकारचे आवाज काढून एकमेकांशी संपर्क साधतात. त्यामध्ये चिवचिवाटासारख्या आवाजांचाही समावेश असतो. पाण्यात आवाज वेगाने प्रवास करत असल्यामुळे या आवाजांच्या मदतीने डुगाँग एकमेकांशी संवाद साधू शकतात. डुगाँगची मादी आपल्या पिल्लाची दीर्घकाळ काळजी घेते. पिल्लू मोठे होईपर्यंत आई त्याला दूध पाजते आणि कालांतराने पिल्लू समुद्री गवत खाण्यास सुरुवात करते.
समुद्री जीवांचा अभ्यास करायचा असेल, तर केवळ प्रयोगशाळेत बसून संशोधन करून चालत नाही. प्रत्यक्ष समुद्रात उतरून त्यांच्या अधिवासाचे निरीक्षण करावे लागते. प्राची यांनी सांगितले की, समुद्राखाली संशोधन करण्यासाठी त्यांनी पोहणे शिकण्यास सुरुवात केली आणि डायव्हिंगचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. समुद्रातील भरती-ओहोटी, मर्यादित वेळेत नमुने गोळा करणे, समुद्री गवताचे निरीक्षण आणि सागरी प्राण्यांच्या हालचालींचा अभ्यास करणे ही कामे संशोधनाचा महत्त्वाचा भाग आहेत.
नवभारत नवराष्ट्रच्या ‘नवदुर्गा’ विशेष पॉडकास्टमधून प्राची यांनी सागरी जीवांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. दुर्मीळ प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांची जीवनशैली, अधिवास, अन्न आणि त्यांच्यासमोरील धोके समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्रातील एखाद्या प्राण्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी केवळ त्या प्राण्याचे संरक्षण पुरेसे नसते, तर संपूर्ण सागरी परिसंस्थेचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे असते. समुद्राच्या अथांग पाण्यात दुर्मीळ डुगाँगचा शोध घेणाऱ्या प्राची यांचा प्रवास हा जिद्द, संशोधनाची आवड आणि पर्यावरण संवर्धनासाठीच्या समर्पणाचे उदाहरण ठरतो.






