दिनी हंबर्डे सांगतायत दृष्टिहीन मुलांची 'डोळस' गोष्ट
नवरात्र म्हटलं की सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. या नऊ दिवसांत देवीचा जागर केला जातो, तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि तिच्या कर्तृत्वाचा सन्मान.
स्त्री शक्ती म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जिजाऊ, रमाई, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, सिंधुताई सपकाळ यांचं कर्तृत्व उभं राहतं. पण त्याचबरोबर आजही आपल्या आजूबाजूला काही अपरिचित पण प्रभावी महिला कार्य करत असतात, ज्या समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी अत्यंत निष्ठेने कार्य करतात.
आपण अनेकदा दुःखाला कवटाळून बसतो. शरीर धडधाकट असूनही “माझ्यासारखा दुःखी कोणी नाही,” असं वाटू लागतं. पण ज्यांच्याकडे हे सुंदर जग पाहण्यासाठी दृष्टीच नाही, त्यांचा आपण कधी विचार करतो का?अशा दृष्टिहीन मुलांसाठीच मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघाचा दृष्टी विभाग गेली १४ वर्षे कार्यरत आहे. विशेष म्हणजे या संस्थेमार्फत दृष्टिहीन मुलांची दहावीच्या अभ्यासक्रमाची तयारी सुद्धा केली जाते. याच कार्याबद्दल ‘नवराष्ट्र नवदुर्गा’ या विशेष मुलाखतीत दृष्टी विभागच्या कार्यवाह नंदिनी हंबर्डे यांनी या मुलांची प्रेरणादायी गोष्ट सांगितली.
‘जिद्द ना सोडली’, योगिता मानेने बस चालवत रचला इतिहास; महिला असूनही पेलली जबाबदारी
एका साहित्य संमेलनात महाराष्ट्र सेवा संघाला काही ब्रेल पुस्तकं मिळाली. ब्रेल लिपी ही दृष्टिहीन व्यक्तींकरिता विकसित केलेली स्पर्शाधारित लेखन व वाचन पद्धत आहे.
या पुस्तकांचा उपयोग कसा करता येईल, यावर चर्चा सुरू झाली. पुढे संस्थेतील कार्यकर्त्यांनी वरळीतील NAB (National Association for the Blind) या संस्थेसोबत चर्चा केली. यातून, “दृष्टिहीन मुलांचा अभ्यास घेतला पाहिजे,” असा निष्कर्ष निघाला. २०११ साली दृष्टिहीन मुलांची अभ्यासिका सुरू करण्यात आली. आजपर्यंत या अनोख्या आणि सकारात्मक उपक्रमातून ३०० हून अधिक दृष्टिहीन विद्यार्थी फक्त दहावी नाही तर आयुष्याच्या परीक्षेत पास झाले आहेत.
दृष्टिहीन मुलांना शिकवणे हे खूप कठीण काम होते. यासाठी आम्ही ९० तासांचे विशेष प्रशिक्षण शिबिर घेतले. या शिबिरात नंदिनी हंबर्डे स्वतः सहभागी झाल्या होत्या. यानंतर NAB कडून अंध मुलांची पहिली तुकडी पाठवण्यात आली. ही मुलं ‘दृष्टी विभागात’ दाखल झाल्यानंतर त्यांचा १७ क्रमांकाचा फॉर्म भरला जातो आणि त्यांच्या अभ्यासाला सुरुवात होते. त्यांना ब्रेल लिपी शिकवली जाते. मुलुंडमधील अनेक महिला या दृष्टिहीन मुलांना विनामूल्य शिकवतात, आणि त्यांची काळजी अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे घेतात.
दृष्टिहीन मुलांना बहुतांश वेळा कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. मात्र आम्हाला वाटत होतं की त्यांनी स्वतःहून स्वावलंबी व्हावं. त्यासाठी संस्थेमार्फत त्यांना स्टिक्स देण्यात आल्या. जेणेकरून कोणीही मदत न करता, ते स्वतः संस्थेपर्यंत येऊ शकतील. आज वांगणीहून एक दृष्टिहीन मुलगा थेट मुलुंडपर्यंत शिक्षणासाठी एकटाच येतो, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.
दृष्टी विभागात मुलं आणि मुलींची योग्य काळजी घेतली जाते. विशेषतः मासिक पाळीच्या काळात दृष्टिहीन मुलींची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते. या मुलींना याविषयी माहिती नसते, म्हणून आम्ही सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध ठेवतो. काही मुली स्वतःहून याविषयी सांगतात, तेव्हा त्यांना सॅनिटरी पॅड आणि नवीन कपडे दिले जातात.
आज दृष्टिहीन मुलांचा अभ्यास घेतल्याने त्यांच्या वाचनाची आवड निर्माण झाली आहे. तसेच, आमच्याकडे ब्रेल लिपीत 30-३५ पुस्तकं आहेत, जी मुलं छान वाचतात. त्यांनी सुधा मूर्तींची पुस्तकं सुद्धा वाचली आहेत.
माझ्या विद्यार्थ्यांपैकी शहाबाज खान नावाचा एक मुलगा आहे, ज्याने चक्क मोटार रेसिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावला! एवढंच नाही, तर त्याने पुढे एम.ए. पूर्ण केलं, आणि आमच्याच दृष्टी विभागात शिकलेल्या एका विद्यार्थिनीशी लग्न केलं. लग्नासाठी त्याने आम्हा सर्वांना आमंत्रण दिलं. त्याचं लग्न पाहताना आमच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.